दिवसांत तब्बल 43500 जणांनी घेतली लस : तीन महिन्यांत उच्चांकी प्रतिसाद
कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सुरू झालेल्या लस उत्सव मोहिमेत पहिल्याच दिवशी 43 हजार 500 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी आरोग्य केंद्रांत सर्वाधिक 1230 लाभार्थ्यांना लस दिली. शिरोळ तालुक्यात 6500 हून अधिक जणांनी लस घेतल्याने जिल्ह्यात तो अव्वल ठरला. चार दिवसांच्या लस उत्सवात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लस घेऊन कोरोनाला प्रतिबंध करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
देशभर रविवारी कोरोना प्रतिबंधक लस उत्सवाला सुरूवात झाली. 16 जानेवारीला आरोग्यसेवकांना लसीकरणाचा पहिला टप्पा तर फेब्रुवारीत प्रंटलाईन वर्कर्सना दुसरा टप्पा सुरू झाला. मार्चमध्ये 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त, 60 वर्षावरील ज्येष्ठांना लसीचा तिसरा टप्पा सुरू झाला तर 45 वर्षांवरील सर्वांना लसीचा चौथा टप्पा सुरू आहे. दरम्यान, राज्यासह जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढल्याने लस घेणाऱया लाभार्थींची संख्याही वाढली आहे. दोन दिवसांपुर्वी लस तुटवडा जाणवल्याने अनेक केंद्रे बंद होती. त्यानंतर रविवारपासून 4 दिवस देशभर लस उत्सव मोहीम सुरू केली आहे.
जिल्ह्यात आजपर्यत 38 हजार 7 जणांना पहिला तर 17 हजार 902 आरोग्यसेवकांना दुसरा डोस दिला आहे. ही टक्केवारी अनुक्रमे 99 व 45 टक्क्यांइतकी आहे. पंटलाईन वर्कर्सपैकी 36 हजार 410 जणांनी पहिला तर 10 हजार 386 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणाची टक्केवारी अनुक्रमे 122 आणि 35 टक्के आहे. 45 वर्षावरील 1 लाख 95 हजार 276 जणांनी पहिला तर 2093 जणांनी दुसरा डोस घेतला. तसेच 2 लाख 94 हजार 851 ज्येष्ठांनी पहिला तर 5 हजार 503 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. जिल्ह्यात 16 लाख लसीचे उद्दिष्ट आहे. 5 लाख 64544 जणांनी लस घेतली आहे.
जिल्ह्यात रविवारी 250 केंद्रांवर लस उत्सव मोहिमेला सुरूवात झाली. मोहिमेत पहिल्याच दिवशी सर्वाधिक 43 हजार 500 जणांनी लस घेतली. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 6500 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. सैनिक टाकळी केंदावर 1230 जणांनी लस घेतली. जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण झालेले हे केंद्र आहे. शहरात फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्रांवर 505 जणांनी लस घेतली. शहरातील ते सर्वाधिक लसीकरणाचे केंद्र आहे. सोमवारी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केद्रांवर 30 हजार 56, जिल्हा, उपजिल्हा रूग्णालयांत 2 हजार 693, महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत 4 हजार 316 तर खासगी हॉस्पिटल्समध्ये 65 जणांनी लस घेतली आहे. लाभार्थ्यांनी लस घेऊन कोरोना प्रतिबंध करण्याचे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी केले आहे.
लस उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन कोरोना विरोधी लढÎाला बळ द्यावे, आपले कुटुंब सुरक्षित राखा, इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करा. – डॉ. फारूक देसाई, जिल्हा लसीकरण अधिकारी