आम आदमी पार्टीचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अनेक जणांचे बळी चालले आहेत. तसेच या तुटवड्याचा फायदा घेऊन काहीजण काळाबाजार करत आहेत. रेमडेसिवीर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संदीप देसाई यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी मेलद्वारे बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पाठविले.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या मृत्युंच्या संख्येबरोबरच रेमडेसिवीर काळाबाजारही मोठया प्रमाणात फोफावत आहे. शासन स्तरावर रेमडेसिवीरचे रेशनींग करण्याची यंत्रणा कार्यरत आहे. तरीही त्यामधील त्रुटींचा गैरफायदा घेत रेमडेसिवीरचा काळाबाजार राजरोसपणे सुरू आहे. कोरोनाच्या कठिण काळातही काही हॉस्पिटलमधील डॉक्टर व स्टाफ रुग्णांची अतिशय मनोभावे सेवा करीत आहेत, त्यांचे मनापासून अभिनंदन. पण काही हॉस्पिटलमधील डॉक्टर व स्टाफ आपल्या यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेत रुग्णाच्या नातेवाईंकाना चढ्या दराने रेमडेसिवीर विकत आहेत.
नुकत्याच कोल्हापुरातील 2 हॉस्पिटलमधे रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला. अशी घटना घडणे म्हणजे, व्यवस्थेनेच रुग्णांचा एक प्रकारे बळी घेणे आहे. या प्रकरणाची माहिती घेतली असता, यामध्ये रुग्णालयातील कोविड रुग्णांवर उपचार करताना शिल्लक राहिलेली रेमडेसिवीरची इंजेक्शन ज्यादा दराने बाहेर विकण्याचे काम चालू आहे या गोष्टीला अधिकृत दुजोरा मिळत आहे. म्हणजेच प्रशासनाने रुग्णासाठी दिलेल्या रेमडेसिवीरचाच वापर काळ्याबाजारासाठी होत आहे व त्यामध्ये हकनाक रूग्णांचा बळी पडत आहे. तरी यापुढे अश्या घटना होवु नये यासाठी प्रशासनातील त्रुटीचा अभ्यास करुन उपाययोजना कराव्यात.