जिल्ह्यात बुधवारी 28 केअर सेंटरमध्ये रूग्णसंख्या निरंक,
10 सेंटरमध्ये सरासरी 2 रूग्ण शिल्लक, शहरातील 3 केअर सेंटर बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण केअर सेंटर 96 : शासकीय 41 खासगी 55 सेंटर
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना रूग्णांसाठी सुरू असलेली केअर सेंटर हळूहळू ओस पडू लागली आहेत. ऑक्टोबरमध्ये पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 15 टक्क्यांपर्यत खाली आली तर कोरोनामुक्तांची संख्या 85 टक्क्यांपर्यत वाढली आहे. त्यातूनच उपचार घेणाऱयांची संख्या घटल्याने बुधवारी 28 केअर सेंटर निरंक झाली, दोन दिवसांत 1 ते 2 रूग्ण असलेली 10 केअर सेंटरही निरंक होणार आहेत. सप्ताहभरात 5 रूग्णसंख्या असलेली आणखी 10 केअर सेंटरही हळूहळू बंद होणार असल्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यात शासकीय हॉस्पिटलशी निगडीत 41 आणि खासगी हॉस्पिटल्स, स्वयंसेवी संस्थांशी निगडीत 55 कोरोना केअर सेंटर कोरोना काळात सुरू झाली. या केअर सेंटरवर ऑक्सिजन बेडसह अन्य सुविधा पॉझिटिव्ह, संशयित रूग्णांना दिल्या आहेत. कम्युनिटी स्प्रेडमुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कोरोना रूग्णसंख्या दुपटीने वाढली, या काळात ही केअर सेंटर रूग्णांसाठी जीवनदायी ठरली आहेत. ऑक्टोबरमध्ये पहिल्या पंधरवड्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढत गेली. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 47 हजारांपर्यत आहेत. त्यापैकी 41 हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत चार हजार रूग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
कोरोना रूग्णांची संख्या घटल्याने केअर सेंटरवरील ताण कमी झाला आहे. काही सेंटर रूग्णांअभावी बंद होण्याच्या मार्गांवर आहेत. बुधवारी रूग्णांअभावी 28 केअर सेंटर रिकामी झाली आहेत. यामध्ये अंडी उबवणी केंद्र, हुपरी, शेंडूर, शिरोली, समिंदर, मुसळे, कळंबा आयटीआय, शिरोळ दत्त कारखाना केअर सेंटरसह खासगी हॉस्पिटल्सशी निगडीत कृष्णा, विन्स, कोल्हापूर आर्थोपेडिक, निरामय इचलकरंजी, विजय, खानदे, महेश सेवा इचलकरंजी, माने केअर सेंटर, कुकरेजा नर्सिग होम, हिरेमठ जयसिंगपूर, वालावलकर हॉस्पिटल, सद्गुरू मल्टिस्पेशालिटी, आनंद, मोर्या वाशीनाका, श्री राजारामपुरी, भारती पेठवडगाव आणि भारती हॉस्पिटल रंकाळा यांचा समावेश आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठातील डीओटी सेंटर सुरू असले तरी विद्यापीठातील हॉस्टेल 1 व 2 मधील केअर सेंटर बुधवारी बंद झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सध्या जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल्सशी निगडीत धन्वंतरी हुपरी, एसएमडी, घोलपे, संजिवनी पन्हाळा, मोरया राजारामपुरी, दत्तसाई, सिटी राजारामपुरी या केअर सेंटरवर सद्यस्थितीत 1 ते 2 रूग्णच उपचार घेत आहेत. ही केअर सेंटर दोन दिवसांत निरंक होण्याची शक्यता आहे. दोनपेक्षा अधिक रूग्णसंख्या असलेली जिल्ह्यात 10 सेंटर आहेत. यामध्ये सिद्धनाथ, यशवंत पन्हाळा, समर्थ, सरस्वती, व्यंकटेश्वरा, मेट्रो आणि स्वस्तिक हॉस्पिटलच्या केअर सेंटरचा समावेश आहे. सप्ताहभरात ही केअर सेंटरही कोरोना रूग्ण निरंक होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात बुधवारी पॉझिटिव्ह, संशयित रूग्णांअभावी 28 केअर सेंटर बंद झाली आहेत. दोन दिवसांत आणखी 10 सेंटर बंद होणार आहेत. सोमवारपर्यत रूग्णांअभावी बंद होणाऱ्या केअर सेंटरची संख्या 50 पर्यत जाण्याची शक्यता वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील निम्म्यांहून अधिक केअर सेंटर बंद झाल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.









