300 बेड फुल्ल, 125 बेडचे नियोजन सुरू, सव्वाशे डॉक्टरांची उणीव कशी भरून निघणार
कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
सीपीआर कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत 300 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सोमवारपासून ईएनटी, आय वॉर्डही खुला होणार आहे. 425 बेडचे नियोजन असले तर सुमारे 125 डॉक्टरांसह अन्य स्टाफची कमतरता भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीपीआर प्रशासनावर ताण येण्याचा धोका वाढला आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून स्टाफची मागणी केली आहे. पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्याचे समोर येत आहे.
सीपीआर हॉस्पिटल 650 बेडचे आहे. कोरोना रुग्णांसाठी नियमावलीनुसार 425 रुग्णांवर येथे उपचार होऊ शकतात. सद्यस्थितीत 300 रुग्ण येथे उपचार घेत आहेत. त्यात अधिकतर गंभीर रुग्ण आहेत. सीपीआर आयसोलेटेड होण्यापुर्वी येथील काही कंत्राटी सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय अधिकाऱयांना कमी केले होते. ही संख्या साधारणतः 100 पर्यत आहे. पॅरामेडीकल स्टाफही कमी आहे. तरीही सीपीआरमधील वैद्यकीय स्टाफ प्रामाणिकपणे रुग्णसेवा करत आहे.
व्यवस्थापनाची तारेवरची कसरत
सद्यस्थितीत 300 रूग्ण येथे उपचार घेत आहेत. पण दैनंदिन वाढणारी रूग्णसंख्या अन् बेडच्या मागणीमुळे सीपीआरमधील स्टाफवर ताण येत आहे. काही स्टाफ हा लसीकरणात गुंतला आहे. अशा स्थितीत सीपीआर व्यवस्थापनाला नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रूग्णसंख्या वाढू लागल्याने सीपीआरमधील बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. सोमवारपासून ईएनटी आणि आय वॉर्डही कोरोना रूग्णांसाठी खुला होणार आहे. पण वॉर्डबॉयची कमी असलेली संख्या डोकेदुखी ठरत आहे. रुग्णांना जेवण, चहा, नाष्टा देण्यासाठी एका वॉर्डबॉयला तीन वॉर्ड फिरावे लागत आहेत. एकीकडे डॉक्टर, पॅरामेडीकल स्टाफची कमी, त्यात चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांची कमी संख्या त्यामुळे रूग्णसंख्या वाढल्यास सीपीआर प्रशासनाला मनुष्यबळाची कमतरता जाणवण्याचा धोका वाढला आहे.
ऑक्सिजन टँक आला, पण स्टाफ कुठेय
सीपीआरमध्ये 20 हजार लिटर्स क्षमतेचा ऑक्सिजन टँक उभारला आहे. पण त्यासाठी बायो इंजिनिअर, अन्य तांत्रिक स्टाफ दिलेला नाही. यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर सध्या ऑक्सिजन टँकची पाहणी अन् नियोजन केले जात आहे. सीपीआरमध्ये बायो इंजिनिअर पदच नाही. तंत्रज्ञ नाही, त्यामुळे या स्टाफचे कायमस्वरुपी नियोजन आवश्यक आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये तंत्रज्ञांची उणीव
सीपीआर हॉस्पिटलमध्यें सिटीस्कॅन, रक्त तपासणी, एक्सरे आदी विभागांत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, मुकादम, ऑपरेशन थिएटर इनचार्ज आदी पदांची कमी आहे. हे तंत्रज्ञ कमी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे कोरोना वाढत असताना रुग्णसंख्या वाढत असताना जिल्हा प्रशासनाने सीपीआरसाठी पुरेसे तंत्रज्ञ देण्याची मागणी वाढत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









