राशिवडे / वार्ताहर
राशिवडे ते चांदे रस्त्यावर सुमारे शंभरहुन अधिक मृत कोंबड्या प्लास्टिक बारदानात बांधून फेकल्या आहेत. आज सकाळी ही धक्कादायक घटना निदर्शनास आली. येथील खोपाळा नावाच्या शेताजवळ या कोंबड्या फेकण्यात आल्या आहेत. प्लँस्टिक पिशवीसह याठिकाणी उघड्यावरच मृत कोंबड्या फेकल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तर सध्या राज्यात बर्ड फ्लूची साथ येत असून सदर कोंबड्या बर्ड फ्लू मुळे मृत झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राशिवडे गावाच्या बाहेर दीड कि.मी.अंतरावर चांदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर या मृत कोंबड्या रात्रीच्यावेळी टाकल्याची शक्यता आहे. काही कोंबड्या प्लँस्टिक पोत्यामध्ये तर काही कोंबड्या उघड्यावरच टाकण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या बाजूलाच या मृत कोंबड्यांचा खच पडला आहे. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.
आज राशिवडे ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी प्रत्यक्ष पहाणी केली. दोन मोठ्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये मृत कोंबड्या आढळून आल्या. तसेच उघड्यावरही काही कोंबड्या टाकण्यात आल्या आहेत. यामुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून या प्रकाराची माहीती घेतली जात आहे. चांदे रोडवरील खोपाळा नावाचे शेत हे राशिवडे पासून सुमारे दीड किलोमीटरवर असून या ठिकाणी वारंवार प्लास्टिक, जैविक कचरा, मृत जनावरे, प्लॅस्टिक, मुदतबाह्य औषधे, सिरींज टाकण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हा रस्ता कचऱ्याचा अड्डा बनला आहे.