प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या येथील खत गोडावूनमध्ये पहाटे तीनच्या सुमारास अचानक पावसाचे पाणी शिरून खत भिजल्याने सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या गोडावूनमध्ये सुमारे एक कोटी रुपयांची खते ठेवली होती. त्यापैकी तळात असणारी पोती पाण्यात बुडाल्याने ती पूर्णपणे खराब झाली तर तत्परतेने अन्य पोती इतरत्र हलविल्याने मोठे होणारे नुकसान वाचले आहे.
राधानगरी तालुका संघाच्या १७ शाखा असून त्यामाध्यमातून खताची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. संघाला लागणारा खताचा माल सरवडे येथील स्वमालकीच्या गोडावून मध्ये ठेवला जातो. नेहमीप्रमाणे या गोडावून मध्ये विविध प्रकारच्या खतांची पोती ठेवली होती. गेल्या अनेक वर्षांत कधीही गोडावूनमध्ये पाणी आले नव्हते मात्र सद्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी गोडावूनमध्ये शिरले. गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात थप्पी मारुन पोती ठेवली होती परंतु पाणी ठराविक उंचीने आत घुसल्याने खालची पोती पूर्णता भिजली.गोडावूनमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळताच अन्य पोती इतरत्र हलवण्यात आली.
खत सुरक्षिततेसाठी संघाने गोडावून उभारले आहे. परंतु मुसळधार पावसामुळे पाणी रात्रीच्या वेळी खतात गेल्याने संघाचे मोठे नुकसान झाले आहे.तरी देखील आम्ही जास्तीत जास्त खत पाण्यापासून वाचवू शकलो अशी प्रतिक्रिया संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी दिली.









