प्रतिनिधी / राधानगरी
राधानगरी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्यापासून इतर रुग्णांवरील उपचार बंद होते. त्यामुळे सामान्य रुग्णांची गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सविता भाटळे आणि आजरा बँक संचालक राजाराम भाटळे यांनी सामान्य रुग्णांवरील उपचार पूर्ववत व्हावेत याकरिता मागणी केली होती. भाटळेंच्या मागणीला जि. प.आरोग्य समितीतून मान्यता मिळाली असून २० ऑगस्टपासून राधानगरी ग्रामीण रुग्णालय पूर्ववत सुरू करण्याचे आदेश मिळाले आहेत. गेली दोन वर्ष कोविडमुळे राधानगरीतील आरोग्य सेवा रखडली होती.
राधानगरी तालुक्यातील कोविड रुग्ण वाढत असल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधितांचीच सोय केली होती. यामुळे सामान्य रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत होता. त्यातच खाजगी दवाखाने संध्याकाळी बंद असल्याने अनेक सामान्य रुग्णांची गैरसोय होत होती. सामान्य रुग्णांना दिलासा मिळवा यासाठी जि. प. सदस्या सविता भाटळे व राजाराम भाटळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील पूर्ववत उपचार सेवा, प्रसूती ग्रह व ओपीडी कक्ष सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार होऊन आरोग्य जि. प. समितीच्या ८ जुलैच्या मासिक मिटिंगमध्ये मान्यता देण्यात आली असून २० ऑगस्टपासून राधानगरी ग्रामीण रुग्णालय पूर्ववत सेवा देणार असल्याने सामान्य ग्रामीण रुग्णांची हेळसांड थांबणार आहे.









