प्रतिनिधी / कोल्हापूर
देश विकासाच्या उंबरठय़ावर आणण्याचे काम माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधींनी यांनी केले. परंतू आता भाजपवाल्यांनी देश विकायची वेळ आणली असून, तो शिल्लक ठेवतात की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजीव गांधी यांनी देशात संगणक आणून आधुनिकतेची कास धरली. त्यामवेळी विरोध करणाऱया भाजपवाल्यांना राजीव गांधी कळलेच नाहीत, असा टोला आमदार पी. एन. पाटील यांनी गुरूवारी येथे लगावला.
दसरा चौकातील शहाजी कॉलेज येथे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या 27 वर्षापासून 35 ते 40 हजार लोकांच्या उपस्थितीत सद्भावना दौड केली जाते. परंतू यंदा कोरोनाच्या संकटामुळे कार्यक्रमात बदल करून, राजीव गांधी यांचे फोटो पूजन करण्यात आले आहे. आमदार पाटील म्हणाले, राजीव गांधी यांनी दिलेल्या योगदानामुळेच सर्वसामान्यांच्या संस्था आहेत. त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून मानधन न घेता त्या जगाव्यात म्हणून आम्ही काम करत आहोत. दिल्लीत राहणाऱया इंदिरा गांधीचे संपूर्ण कुटुंबियांची साधी राहणी पाहिल्यावर त्यांचे मोठेपण जाणवते. नाहीतर 10 लाखाचा कोट घालून मिरवणाऱयांची संख्या कमी नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
राम मंदिराचे भूमीपूजन करण्याची वेळ नाही
आमचा राम मंदिराला विरोध नाही, परंतू देशावर कोरोनाच्या महामारीचे संकट आले असताना करोडो रूपये खर्च करून, राममंदिराचे भूमीपूजन करण्याची वेळ नाही. पुतळे जरूर उभारा पण जनतेचे कष्ट दुर्लक्ष करू नका, असा टोलाही नाव न घेता आमदार पाटील यांनी लगावला.
सद्भावना दौड रद्दची खंत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्भावना दौड रद्द करावी लागल्याची खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली. दरवर्षी व्यासपीठावर जितके लोक उपस्थित असायचे त्यापेक्षा कमी लोकांमध्ये मुख्य कार्यक्रम करावा लागत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.









