सारथीच्या उपकेंद्रासाठी जागा मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगाने हालचाली
प्रतिनिधी / कोल्हापूर
सारथीच्या उपकेंद्राची उभारणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जागा संपादित करण्याच्या दृष्टीने वेगाने प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राजाराम महाविद्यालयाच्या परिसरातील जागेची पाहणी केली. तसेच यावेळी जागेची संपूर्ण माहिती घेण्यात आली.
राज्य सरकारने सारथीच्या उपकेंद्राची कोल्हापुरात उभारणी करण्यास मंजुरी दिल्यानंतर जागा मुद्दा महत्वाचा ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जागा शोधून त्या संदर्भात राज्य सरकारकडे माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जागांचा शोध सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनीही आमदार चंद्रकांत जाधव, मराठा समाज समन्वयक, सारथीचे अधिकारी यांच्यासह शहरातील चार ठिकाणच्या जागांची पाहणी केली. बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राजाराम महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील जागेची पाहणी केली.
विशेष म्हणजे राजाराम महाविद्यालय राज्य शासनाचे आहे. त्यामुळे या ठिकाणी जागा निश्चित झाली तर ती मिळण्यास अडचणी येणार नाहीत, असा मत प्रवाह आहे. त्याचबरोबर या परिसरात शिवाजी विद्यापीठ, सायबर, गर्व्हमेंट पॉलिटेक्निक, कृषी महाविद्यालय आदी शैक्षणिक संस्था असल्याने या ठिकाणी जर सारथीचे उपकेंद्र उभारले तर त्याचा भविष्यात मराठा विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे मतही मराठा समन्वयक वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आदी मंडळी व्यक्त करत आहेत.
शाहू मिलच्या जागेचा पर्याय : मराठा ऑर्गनायझेशन
मराठा ऑर्गनायझेशनने सारथीचे उपकेंद्र शाहू मिलच्या जागेत उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे. सारथीच्या कार्यालय आणि वसतिगृहासाठी शाहू मिलची जागा आरक्षित करण्यात यावी, अशी मागणी मराठा ऑर्गनायझेशचे ऋतुराज माने, राजवर्धन बिरंजे, मंदार पाटील, अभिजित राऊत, अजय शिंदे, केदार माने, प्रथमेश देसाई, सिद्धांत गुडाळे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना देण्यात येणार आहे.