सर्वोतोपरी मदतीची खासदार संभाजीराजे यांची ग्वाही : प्राचार्यांसह माजी राजारामीयनशी केली चर्चा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर संस्थानचे अधिपती छत्रपती राजाराम महाराजांचा (दुसरे) पुतळा त्यांच्याच नावाने असलेल्या संस्थानकालिन राजाराम महाविद्यालयात लवकर उभारण्यात येणार आहे. पुतळा उभारण्यासाठी आवश्यक ती सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी दिली.
खासदार संभाजीराजे यांनी शुक्रवारी राजाराम महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी प्राचार्य खेमनर यांच्यासह माजी राजारामीयन सर्वश्री हेमंत पाटील, दीपक जमेनिस (माजी जीएस), श्रीकांत सावंत, शशांक पाटील, प्रवीण खडके, संजय सावंत आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा उभारणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. प्राचार्य खेमनर यांनी पुतळा उभारणीसंदर्भातील संकल्पित आराखडा सादर करून माहिती दिली. पुतळा उभारणी करण्यापूर्वी समितीची स्थापना करण्याविषयी सूचना श्रीकांत सावंत, शशांक पाटील यांनी केल्या. पुतळा उभारणी लोकसहभागातून व्हावी, असे मत दीपक जमेनिस, हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. खासदार संभाजीराजे यांनी पुतळा उभारणीसाठी शासकीय पातळीवर ज्या पद्धतीची मदत, सहकार्य लागेल ते पेले जाईल. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे स्पष्ट करताना छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा भावी पिढीसाठी पेरणा देणारा ठरेल, असे सांगितले. यावेळी प्रा. संजय पाठारेही उपस्थित होते.
असे होते छत्रपती राजाराम महाराज (दुसरे)
कोल्हापूर संस्थानचे सहावे छत्रपती शिवाजी (तिसरे) यांचे 4 ऑगस्ट 1866 रोजी निधन झाल्यानंतर पाटणकर घराण्यातील नागोजीराव पाटणकर यांना दत्तक घेण्यात आले. तेच पुढे 18 ऑक्टोबर 1866 रोजी छत्रपती राजाराम महाराज दुसरे म्हणून गादीवर आले. त्Îांनी प्रजाहितदक्ष राजा म्हणून राज्यकारभार केला. आपल्या रयतेसाठी शिक्षणाच्या सुविधा त्यांनी संस्थानात दिल्या. 1 ऑक्टोबर 1870 रोजी छत्रपती राजाराम महाराज यांचे इटली दौऱयावर असताना फ्लॉरेन्स येथे निधन झाले. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही त्यांची समाधी आणि पुतळा फ्लॉरेन्समध्ये आहे.
बाळ पाटणकर यांचा पुढाकार
छत्रपती राजाराम महाराजांच्या जनक घराण्याचे वारस असणारे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांनीही खासदार संभाजीराजे यांना छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा उभारणीसंदर्भात एका पत्राव्दारे विनंती केली आहे. पाटणकर घराणे पुतळा उभारणीत भरीव मदत करण्यास तयार असल्याचेही बाळ पाटणकर यांनी स्पष्ट केले.
पुतळा समिती लवकरच स्थापन
छत्रपती राजाराम महाराज पुतळा समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे यांच्यासह राजाराम कॉलेजचे प्राचार्य, माजी विद्यार्थी यांचा या समिती समावेश करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे.









