वार्ताहर/उचगाव
तळ्याच्या मध्यभागी गेलेल्या जनावरांना हुसकावण्यासाठी तळ्याच्या कठड्यावर गेल्या एक महिला तोल जावून खोल पाण्यात पडली. यावेळी तळ्याच्यासमोरून आपल्या कामासाठी जात असताना दोन युवक सिध्दांत रमेश बळे (वय २२) व आनंदा बाबू वाघमोडे (४०) यांनी क्षणाचा विलंब न लावता पाण्यात उड्या मारून या बुडणार्या महिलेचा जीव वाजवला. रत्नाबाई वसंत शिरगांवे (वय ५५) असे या महिलेचे नाव आहे. जिवाची पर्वा न करता एका महिलेचे प्राण वाचविलेबद्दल या दोघा युवकांचे त्यांच्या धाडसाचे गावभर कौतूक होत आहे.
गडमुडशिंगी (ता.करवीर) येथे यशवंत गंगासागर या गावतलावामध्ये गावातील महिला धुणे धुण्यासाठी व जनावरांना पाणी पाजणेसाठी येतात. रत्नाबाई वसंत शिरगांवे (वय ५५) या जनावरांना घेवून पाणी पाजणेसाठी आल्या होत्या. तळ्याच्या मध्यभागी गेलेल्या जनावरांना हुसकावण्यासाठी रत्नाबाई या तळ्याच्या कठड्यावर गेल्या व जनावरांना हुसकावताना त्यांचा तोल जावून त्या खोल पाण्यात पडल्या. यावेळी या दोघां युवकांनी क्षणाचा विलंब न लावता पाण्यात उड्या मारून शिरगावे यांना सुखरूप पणे बाहेर काढले.
ही घटना घडत असताना रत्नाबाईचे पती हे सोबत होते. याबाबत ते म्हणाले कि माझ्यासमोर माझी पत्नी दोन वेळा बुडून वर आली. वयामुळे मला पाण्यात उतरावयास वेळ लागला. मात्र दोन युवकांच्या प्रसंगावधानाने व धाडसामुळे माझ्या पत्नीचे प्राण वाचले. त्यामुळे त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. या युवकांचा सत्कार करणेत आला. यावेळी नामदार बंटी पाटील गटाचे गटनेते रावसाहेब पाटील, दिलीप शिरगावे, वसंत शिरगावे, ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग पाटील, अजित पाटील, तानाजी शिरगावे, संतोष शिरगावे, नारायण माने,सिध्दांत भोपळे,दौलत मानदेशी, संदिप शिरगांवे व भागातील युवक, महिला व नागरिक उपस्थित होते.









