प्रतिनिधी / सरवडे
शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विविध पिके व वैरणीसाठी वारंवार लागणार्या युरियाची सध्या ग्रामीण भागात तीव्र टंचाई भासत आहे. यामुळे शेतकर्यांचे पीक व वैरण धोक्यात आली असून बळीराजा हवालदिल झाला आहे. ही टंचाई उत्पादक व कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने निर्माण झाली आहे. असा आरोप सोळांकूर ता. राधानगरी येथील भूमाता शेती सेवा केंद्राचे मालक व वृतपत्र विक्रेते के. बी. पाटील यांनी केला आहे.
सध्या शेतात भात, ऊस व वैरणीवर मारण्यासाठी युरियाची नितांत आवश्यकता आहे. यासाठी शेतकरी दररोज क्रषी केंद्राकडे युरियाची मागणी करत आहे. मात्र कृषी सेवा केंद्रचालक ज्या मुख्य वितरकाकडून युरिया खरेदी करतात. त्यांच्याकडून युरियाबरोबर न खपणारे इतर खत घेण्याची सक्ती केली जाते. याबाबत क्रषी अधिकार्यांकडे तक्रार केल्यास दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे युरियाअभावी हातातोंडाशी आलेले पीक बळीराजाला गमावण्याची वेळ आली आहे. अगोदरच अनेक संकटाच्या द्रष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना क्रषी खात्याने त्वरित युरिया उपलब्ध करून द्यावा.व पिक वाचवावे अशी मागणी समस्त शेतकरी वर्गाकडून होत आहे.









