कोल्हापूर / प्रतिनिधी
यंदाच्या हंगामातील उसाच्या एफआरपीमध्ये शंभर रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाच्या समितीने केलेल्या शिफारशीला बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता गत हंगामात 2750 रुपये प्रतिटन सरासरी एफआरपी मिळाली होती. आगामी हंगामात 2850 रुपये प्रतिटन मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
पहिले दहा टक्के ला 2850 त्यानंतर पुढील प्रत्येक एक टक्के ला 285 मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सरासरी 12 टक्के आहे. त्यामुळे 2850 अधिक 570 रुपये असे एकूण 3420 रुपये होतात यातून ओढणी ओढणी वाहतूक सरासरी पाचशे पन्नास रुपये वजा जाता 2870 रुपये सरासरी एफआरपी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकते.









