स्थानिक गुन्हे शाखा इचलकंरजी यांची कारवाई
प्रतिनिधी / जयसिंगपूर
शिवाजीनगर पोलीस ठाणेमध्ये संघटित गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत अटक करण्यात आलेल्या आरोपी विकास उर्फ विकी खंडेलवाल, मनीष उर्फ मन्या नागोरी यांच्या गँगमधील साथीदार भीमा सुभेदार चव्हाण हा पोलिसांना गुंगारा देऊन विकी व मन्या गँगला पैसे गांजा मोबाईल पुरवण्याचे व पैशासाठी धमकावून लोकांकडून खंडणी गोळा करण्याचे काम करत होता याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये विकासखंडेलवाल, मनीष नागोरी, शकील गवंडी, भीमा चव्हाण यांच्यावर खंडणीच्या गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून भीमा चव्हाण हा पोलिसांना गुंगारा देत अटक टाळत होता. फरारी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भीमा चव्हाण याचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली खास पथक कार्यान्वीत करण्यात आले होते. या पथकातील पोलीस अंमलदार फिरोज बे ग यांना मिळालेल्या माहितीनुसार भीमा चव्हाण हा जत येथे त्याच्या मित्राच्या शेतामध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजीच्या खास पथकाने जत येथे जाऊन भीमा चव्हाण यास बुधवार दिनांक 25 रोजी शिताफीने ताब्यात घेतले विकी मन्या गॅंगमधील सदरचा आरोपी भीमा चव्हाण यास पुढील तपास कामी उपविभागीय पोलिस अधीक्षक जयसिंगपूरचे रामेश्वर व्यंजने यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, सहायक फौजदार राजू कांबळे, पोलीस नाईक रणजीत पाटील, बालाजी पाटील, प्रशांत कांबळे, पोलीस अमलदार फिरोज बेग, महेश खोत यांनीही यशस्वी कामगिरी केली.









