एक महिला गेली वाहून
पाटगांव / वार्ताहर
भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव फुटला. तलाव फुटल्याने पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता यामध्ये ओढ्याच्या दोन्ही बाजूची सर्व पिके वाहून गेली. ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. यात मेघोली, नवले, सोनूर्ली ममदापुर, वेंगरूळ गावचे मोठं नुकसान झाले आहे. तर, नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते (वय-५५) या वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
धनाजी मोहिते हे पत्नी, मुलगा, नातू आपल्या गोठ्यात असणाऱ्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करीत होते. काही जनावरे सोडली. पाणी अचानक वाढल्याने अंधारातून पाण्याबरोबर सर्वजण वाहून गेले. यात धनाजी व त्याचा मुलगा, नातू एका झाडाला धरून बसले व कसेबसे बाहेर पडले. परंतु आपली आई वाहून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. दरम्यान त्यांचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळला.
मेघोली, नवले, सोनूर्ली ममदापुर, वेंगरूळ या गावात मेघोली प्रकल्प फुटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. रात्रीच्या झोपेत असणारे अनेक नागरिक ओढ्याच्या दिशेने धावले. पाणी पाहण्यासाठी नागरिकाने मोठी गर्दी केली होती. तलाव रात्रीचा फुटल्याने पाण्याच्या प्रवाहाचा आवाज तब्बल दोन किलोमीटरपर्यंत येत होता. ओढ्याचे हे आक्राळ-विक्राळ रूप पाहून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. तलाव रात्रीचा फुटल्याने नुकसानीचा नेमका अंदाज बांधता येत नव्हता परंतु या घटनेमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.
Previous Articleमनपात निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर
Next Article म. ए. समितीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा









