टॅक्सी मालक सचिन जाधव यांची माणुसकीतून समाजकार्य
अंत्यसंसाकारासाठी शववाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर स्वतःच्या टॅक्सीतून नेला मृतदेह
प्रतिनिधी / कोल्हापूर
जागतिक महामारी म्हणून घोषित केलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा परिस्थितीत माणसाचे जगणे तर मुश्किल बनले आहेच, पण मृत्यूनंतर ही अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशीच एक घटना आपटेनगर परिसरातील शांती उद्यान येथील एका कुटुंबाच्या बाबतीत घडली. पण त्यांच्या मदतीला समाजकार्य करण्याच्या उद्देशाने याच परिसरातील टॅक्सी चालक सचिन जाधव धावून आले.
या घटनेची हकीकत अशी की, सहा दिवसापूर्वी आपटेनगर परिसरातील शांती उद्यान येथील एका वृद्धेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पहाटे तीन च्या सुमारास मृत्यू झाला. कोरोना काळात शहरात मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे मृतदेह नेण्यासाठी शववाहिका, रुग्णवाहिकेसाठी सध्या वेटिंग करावे लागत आहे. पहाटेची वेळ असल्यामुळे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यास शववाहिका, रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. पहाटेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत नातेवाईकांनी वाट पाहिली, अनेक प्रयत्न केले पण तरीही मृतदेह पंचगंगा नदीवर अंत्यसंस्काराला नेण्यासाठी कोणतीच व्यवस्था होत नव्हती.
त्यातच कोरोनाच्या भितीमुळे कोणतेही खाजगी वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे अंत्यसंस्काराला उशीर तर होत होताच शिवाय त्या कुटुंबियाचीही मानसिक घालमेल ही सुरू होती. तेवढ्यात याच परिसरात राहणारे टॅक्सी चालक सचिन जाधव त्याठिकाणी पोहचले. त्यांना सादर बाब समजल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या प्रवासी वाहतूक टॅक्सीतुन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याची तयारी दाखवली. व लागलीच गाडीच्या सीट बाजूला करून आपल्या स्वतःच्या टॅक्सीतून मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीपर्यंत नेला व तेही कोणतेही भाडे न आकारता.
यातूनच समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो व माणुसकीतून समाजकार्य काय असते हे सुध्दा समाजाला दाखवून दिले. सचिन जाधव यांनी केलेल्या समाजकार्याबद्दल परिसरातून आभार तर व्यक्त होत आहेतच शिवाय त्या वृद्धेच्या कुटुंबियांनीही संकटाच्या काळात सचिन जाधव देवासारखे आमच्या मदतीला धावून आले. त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाहीत. त्यांनी केलेली मदत आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नसल्याचे सांगितले.
माणुसकीच्या भावनेतून आपण हे कार्य केले– सचिन जाधव, टॅक्सी चालक/मालक
माणुसकीच्या भावनेतून आपण हे कार्य केले आहे. समाजात वावरत असताना कोणावर असे संकट आले तर निस्वार्थ पणे त्यांच्या मदतीला जाणे हे आपले अध्य कर्तव्य आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये पण आलीच तर सद्यस्थितीत समाजातील प्रत्येकाने एकमेकांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे.