कसबा बावडा येथील घटना, शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
प्रतिनिधी / कोल्हापूर
पूर्ववैमनस्यातून कसबा बावडा येथे गुरुवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील दोघेजण जखमी झाले. माजी नगरसेवक श्रावण फडतरेंसह आठ जणांवर खुनाच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल झाले. फिर्याद प्रवीण दगडू लोंढे (वय 27) आणि संदीप महालू वडर (वय 37) यांनी दिली.
कसबा बावडा येथील भगतसिंग वसाहतीजवळील चौकात दोन गटात गुरुवारी 19 रोजी हाणामारी झाली. तलवार, काठÎांचा वापर झाल्याने यात दोघे जण गंभीर जखमी झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. जखमी प्रवीण लोंढेने दिलेल्या फिर्यादीनुसार पूर्वीच्या भांडणातून संशयित संदीप वडर, बहीण शुभांगी (पूर्ण नाव पत्ता समजले नाही) या दोघांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. तसेच जखमी संदीप वडर यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार `यापूर्वीचा दाखल गुन्हा मागे घेण्याबाबत सांग’, अशी धमकी देत संशयित माजी नगसेवक श्रावण फडतरे, प्रविण लोंढे, विकी लोंढे, योगेश पाटवळे, विवेक भोसले, विशाल भोसले (पूर्ण नाव पत्ता समजले नाही) या सहा जणांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार संबधित आठ संशयितावर गुन्हा दाखल झाला.









