पश्चिम पन्हाळा भागात जनजीवन विस्कळीत
वार्ताहर/उत्रे
पन्हाळा तालुक्यातील माजगाव-पोर्ले मार्गावर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कासारे नदीला पूर आला असून यंदा दुसऱ्यांदा माजगाव पोर्ले हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मागील आठवड्यात कासारी नदीला आलेल्या पुरामध्ये हा रस्ता पाच दिवस बंद होता. नदीकाठावरील पिके पुन्हा पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या परिसरात जून व जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडला. पण गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. कासारी नदीला महापूर आला आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने नदी च्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. बांधारी परिसराला पावसाने जोरदार झोडपले असून भाचरवाडी खडेखोळ रस्ता खचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. उञे येथे शिवारात पाणीच पाणी झाले आहे. नदी काठी असलेली सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. ओठे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकरी शिवारात जाताना धास्तावलेले आहे. तर, पश्चिम पन्हाळा भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.