पुनर्वसन मागणी, ग्रामस्थांचे तहसिलदारांना निवेदन
वार्ताहर /म्हासुर्ली
धामणी मध्यम प्रकल्पाचा डावा कालवा (कॅनॉल) चौके व मांडवकरवाडी (ता.राधानगरी) या दोन्ही गावांच्या बरोबर मधून जातो.परिणामी भविष्यात कालव्यामुळे दोन्ही गावातील २३ घरांनां अतिवृष्टी व महापुराचा पासून धोका निर्माण होणार आहे. तरी कालव्यालगत येणाऱ्या कुटुंबांचे शासनाने योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी राधानगरी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या वीस वर्षापासून रखडलेल्या धामणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाली आहेत. त्यामुळे भविष्यात प्रकल्पातील अतिरिक्त पाण्यामुळे चौके,मांडवकरवाडी गावामधील घरानां कालव्यातील पाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. तसेच सध्या अतिवृष्टी मध्ये ही चौके येथील संपुर्ण डवरी गल्लीतील १० व मांडवकरवाडीतील १३ घरांच्या परड्यापर्यंत या कालव्याचे पाणी येते. त्यामुळे येथील कुटुंबे वर्षोनवर्षे जीव मुठीत धरुन जगत आहेत.
येणाऱ्या काही वर्षात धामणी प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर पाणी साठवण केल्यावर कालव्यातुन पाण्याचा प्रवाह अधिकच वाढणार असुन सदर २३ घरांना धोका निर्माण होणार आहे. तसेच सदर कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने धोकादायक क्षेत्र म्हणुन यापूर्वी घोषीत करून त्यांना नोटीसाही दिल्या आहेत.
धामणी प्रकल्पाजवळील ही गावें अतिदुर्गम असल्याने येथे लवकर मदत पोहचत नाही. नैसर्गिक बदलामुळे अतिवृष्टी, महापुर, भूस्खलन अशा गंभीर समस्यांना जनतेला सामना करावा लागत आहे.अशावेळी येणाऱ्या काळात एखादी अनुचित घटना या परिसरात घडू शकते. तरी शासनाने याची गंभीर दखल घेऊन कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावे अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी तहसिलदार यांच्याकडे केले असून निवेदन नायब तहसिलदार विजय जाधव यांनी स्विकारले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशासनाने पुनर्वसन करावे..!
दोन्ही गावातील २३ कुटुंबे अतिवृष्टी व महापुरात काळात जीव मुठीत येथे राहत असतो. रात्र जागुन काढावी लागते.प्रवाहाचे पाणी कधी घरात पोहचेल याची शाश्वती नाही. तरी प्रशासनाने आम्हाला धोकादायक क्षेत्रांच्या जशा नोटीसा लागु केल्या आहेत. त्याच प्रकारे आमचे कायमचे पुनर्वसन करावे.तसेच पुनर्वसनासंदर्भात आमदार प्रकाश आबिटकर यांनी वैयक्तीक लक्ष घालावे.
दिपक कदम, पोलिस पाटील, मांडवकरवाडी









