वारणानगर / प्रतिनिधी
सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या शिराळा व पन्हाळा तालुक्यातील नागरिकांची गेल्या २६ वर्षांची मागणी असलेला वारणा नदीवरील मांगले-काखे दरम्यानच्या १२ कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे काम गतीने सुरू झाले असल्याने या कामाचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे पाठपुरावा करून हा पूल केंद्रीय रिझर्व्ह फंडातून मंजूर करून घेतला होता. या पुलासाठी 12 कोटी रुपये खर्च असून या पुलाचे भूमिपूजन तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख यांच्या हस्ते झाले होते. काम सुरू करण्यापुर्वीच कोरोनाच्या महामारीचे संकट व पावसामुळे पुलाचे काम सुरु करता आले नाही. मात्र ऑक्टोबर पासून कामास सुरुवात झाली आहे. जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. पुलाचे ऐकून आठ पिलर असून सात गाळे आहेत यापैकी ५ पिलर्सचे काम पूर्ण झाले आहे. पुलाची ऐकूण लांबी १४० मिटर आहे तर उंची २००५ च्या पुररेषेवर्ती धरली आहे त्यामुळे पूल कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला राहणार आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा तालुका व पन्हाळा तालुक्यातील नागरिकांना व वारणा उद्योग समूहासह कोल्हापूरसाठी ये जा करण्यासाठी या पुलाचा मोठया प्रमाणात उपयोग होणार होणार आहे. काखे, मोहरे, कोडोली, व वारणा परिसरातील अनेक गावाची शिराळा तालुक्यासह मांगले कडे जाण्यासाठीची पावसाळ्यात होणारी अडचण दूर होणार आहे. या पुलाच्या बांधकामामुळे वारणा परीसरातील गांवामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.









