वार्ताहर / पुलाची शिरोली
शिवरायांचे नाव घेवून सरकार चालवण्याची भाषा करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील महिला व मुली असुरक्षित आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृह व गृहराज्यमंत्री यांची आहे. पण ते मंञी राहूल गांधीचा व्हायरल व्हिडिओ पाहून वेगळ्या कामात व्यस्त आहेत. अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली. त्या महिलांच्यावरील वाढत्या अत्याचारी घटनेमुळे महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ पुलाची शिरोलीत आंदोलन प्रसंगी बोलत होत्या. तालुका अध्यक्ष राजेश पाटील व पं. स. सदस्या डॉ. सोनाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्या पुढे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील महिला व मुलींवर अनेक प्रकारच्या अत्याचारी घटना घडत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्यशासन व गृह विभागाला अपयश आले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री हे स्वताचे अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडण्यात व्यस्त आहेत. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, डॉ. सोनाली पाटील व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतिश पाटील यांची निषेध भाषणे झाली.
यावेळी महिला मोर्चा उपाध्यक्षा पुष्पा पाटील, ग्रा.पं.सदस्या मनिषा खटाळे, तेजस्विनी पाटील, मधुरा चौगुले, स्वाती तानवडे, संदीप पोर्लेकर, संदीप तानवडे, संभाजी भोसले, दिलिप शिरोळे, शिवाजी गाडवे. आभार डॉ. सोनाली पाटील यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात महिलांनी हातात फलक घेवून निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला