प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिका निवडणुकीत राजकारण बदलले आहेत. शिवसेनेत चांगले वातावरण आहे. कोणतीही गटबाजी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांकडूनही बळ दिले जात आहे. इच्छूकांचा कलही शिवसेनेकडे वाढत आहे. विजयी होतील असे 30 हून अधिक उमेदवारी संपर्कात आहेत. यंदाची निवडणुक संपूर्ण ताकतीनिशी लढणार असून महापौर हा शिवसेनेचाच होणार, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
माजी आमदार क्षीरसागर म्हणाले, महापालिका निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात उलाढाली होतात. येथेच सेनेचे उमेदवार मागे पडतात. मात्र यंदा वातावरण बदलले आहे. पक्षात सकारत्मक वातावरण आहे. शिवसेनाही यावेळी सर्व मार्ग अवलंबणार आहे. शहरातील बहुतांश प्रभागांची चाचपणी पूर्ण झाली आहे. अनेक तगडे उमेदवार सेनेच्या संपर्कात आहेत. यंदाच्या निवडणुकीत संख्याबळ नक्कीच वाढणार असून महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेने केला असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, माजी महापौर सरीता मोरे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, नियाज खान, राहूल चव्हाण, माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, प्रतिज्ञा उत्तुरे, ऋतुराज क्षीरसागर आदींसह अन्य पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
कुणाच्या कार्यक्रमाची भाषा करणार नाही
बावड्यातील एका कार्यक्रमात जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांने माझ्या विरोधात जातील त्यांच्या कार्यक्रम करणार, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य लोकशाहीला काळीमा फासणार आहे. त्यांच्याकडून दडपशाहीचा अवलंब सुरु आहे, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता, आम्ही कुणाच्या कार्यक्रमाची भाषा करणार नाही, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
अजित मोरे, तेजस्विनी इंगवलेंची उपस्थिती
शिवसेनेने माजी महापौर सरीता मोरे आणि माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे यांना शिवबंधनात अडकवून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीला आणखी एक धक्का मिळाला आहे. माजी समिती सभापती अजित मोरे गळ्यात भगवा मफलर घालून पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्याचबरोबर शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या पत्नी ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले याही पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी पाठोपाठ ताराराणी आघाडीलाही सेनेने धक्का दिला आहे.