प्रतिनिधी / कोल्हापूर
गेली अनेक वर्षे महापालिकेत सेवा बजावत असलेल्या कामगार संवर्गातील 641 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा. त्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाने एका पत्रकाव्दारे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.
महापालिकेतील झाडू कामगार, सफाई कामगार, पवडी कामगार म्हणून सेवा बजावणारे 641 कर्मचारी गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करत आहेत. त्यातील काही निवृत्तीकडेही झुकले आहेत. वारंवार मागणी करूनही त्यांना आजवर सेवेत कायम करण्यात आलेले नाही. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. असा प्रस्ताव महापालिकेने सादर केल्यानंतर तो मंजूर करून आणण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचाही कर्मचारी संघाच्या या मागणीला पाठिंबा आहे.
आजवर वारंवार प्रस्ताव पाठविण्याची मागणी करूनही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे या रोजंदारी कर्मचाऱयांना न्याय देतील, असे कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी सांगितले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा युनिफॉर्म व इतर मागण्याही निवेदनात नमूद केल्याचे भोसले यांनी सांगितले.