मतदार यादी तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश,निवडणूक प्रक्रियेला पुन्हा वेग, राजकीय हालचालीही होणार गतिमान
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे आता थंडावलेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा गतिमान झाली आहे. मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमानुसार आचारसंहितेचा कालावधी पाहिल्यास एप्रिलमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणुकीसंदर्भात काहीशी निश्चिती झाल्याने राजकीय हालचालींनाही वेग येणार आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारही कंबर कसणार आहेत.
महापालिकेच्या प्रशासनाला राज्य निवडणूक आयोगाचा आदेश ई-मेलव्दारे मंगळवारी प्राप्त झाला. त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यासंदर्भातील निश्चित कार्यक्रमही दिला आहे. मतदार यादी तयार करताना भारत निवडणूक आयोगाची 15 जानेवारी 2021 पर्यंतची मतदार यादी ग्राहÎ धरण्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 15 जानेवारी 2021 ची कटऑफ तारीख अर्थात त्यादिवशी महाराष्ट्र विधानसभेची जी मतदार यादी अस्तित्वात असलेली ती यादी वापरण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
एप्रिलमध्ये निवडणूक शक्य
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 16 फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तर 12 मार्चला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही क्षणी महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच संकेतही मिळत आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वसाधारणपणे पंचेचाळीस किंवा तीस दिवसांनी निवडणूक जाहीर केली जाते, असे संकेत आहेत. त्यानुसार पंचेचाळीस दिवसांचा कालावधी गृहित धरल्यास निवडणूक मे महिन्याच्या पहिल्या आठवडÎात होऊ शकते तर तीस दिवसांचा कालावधी गृहित धरल्यास एप्रिलच्या दुसऱया आठवडÎात होऊ शकते. सद्यःस्थितीत तीस दिवसांचा कालावधी गृहित धरून एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडÎात निवडणूक होऊ शकते. मतदार यादीच्या प्रसिद्धीनंतर कोणत्याही क्षणी निवडणूक तारीख जाहीर होऊन आचारसंहिताही लागू होऊ शकते.
मतदार यादीचा कार्यक्रम असा
1) प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे : 16फेब्रुवारी
2) प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल : 16फेब्रुवारी ते
करण्याचा कालावधी 23 फेब्रुवारी
3) प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे : 3 मार्च
4)मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे : 8 मार्च
5) अंतिम प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार : 12 मार्च
याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे.
सहा पक्ष रिंगणात
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत कार्यकाळ पूर्ण केलेल्या सभागृहातील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन मित्रपक्ष स्वबळावर लढणार आहेत. त्याचबरोबर विरोधी भाजप-ताराराणी आघाडीही रिंगणात उतरणार आहे. आम आदमी पार्टीनेही दंड थोपटले आहे. त्याचबरोबर ऐन निवडणुकीत आपलं ठरलंय सारख्या आघाडÎाही रिंगणात असणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेला गती
2015 अस्तित्वात आलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची पंचवार्षिक मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली होती. पण कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक पुढे गेल्याने महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाला. सध्या प्रशासकराज आहे. निवडणुकीसाठी डिसेंबरमध्ये प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण प्रक्रिया झाली. त्यानंतर हरकती, सूचना मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणीही झाली. त्याचा अहवालही राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. प्रभाग रचना आणि आरक्षणावरील गॅझेट दोन दिवसांत प्रसिद्ध होणार आहे. त्यातच आता मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिल्याने निवडणूक प्रक्रिया गतिमान झाली आहे.