प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी शहरातील 81 प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाटÎगृहात तब्बल तीन तास चाललेल्या सोडतीच्या प्रक्रियेत प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांच्या उपस्थितीत महापालिकेच्या प्रशासनाने ही प्रक्रिया राबविली. प्रभागाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर राजकीय रणधुमाळीला सुरूवात होणार आहे.
दरम्यान, मुदत संपलेल्या सभागृहातील अनेक नगरसेवकांना आरक्षण बदलाचा फटका बसला आहे. तर आजवर आरक्षणामुळे संधी हुकलेल्या अनेक इच्छुकांना आता प्रभाग खुला झाल्याने लढता येणार आहे. दरम्यान, आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची तयारी केलेल्या इच्छुकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
तीन तास आरक्षण सोडत प्रक्रिया
81 प्रभागांसाठी आरक्षण काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली होती. संगीतसूर्य केशवराव भोसले नाटÎगृहात तब्बल तीन तास सोडतीची प्रक्रिया चालली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, सहाय्यक आयुक्त संदीप घारगे, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, लेखापाल संजय सरनाईक, विजय वणकुदे आदीसह अधिकाऱयांनी आरक्षण सोडत प्रक्रिया राबविली. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, अवर सचिव अतुल जाधव, कक्ष अधिकारी प्रदीप परब आदी या प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून आले होते.
सकाळी अकरा वाजता सोडत प्रक्रिया सुरू झाली. उपायुक्त निखिल मोरे यांनी 3 जानेवारी, 14 जानेवारी आणि 29 जानेवारीच्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार आणि 15 डिसेंबरला प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्षात आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने प्रारंभी स्पष्ट केले. त्याचबरोबर आरक्षण काढत असताना 2011 ची लोकसंख्या आणि 2005, 2010 आणि 2015 या निवडणुकीत असणाऱया आरक्षणाचा विचार करून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चक्राकार पद्धतीन आरक्षण काढण्यात येणार आहे. प्रभागावर आरक्षण टाकत असताना प्रगणक हा बेस धरून प्रक्रिया केली जात असल्याचेही उपायुक्त निखिल मोरे यांनी स्पष्ट केले.
प्रभागांचे वाचन केल्यानंतर सोडत प्रक्रिया सुरू
सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी प्रभागांचे वाचन केले. तांत्रिक माहिती दिल्यानंतर आरक्षित केलेले प्रभाग आणि सोडतीव्दारे निश्चित करायचे प्रभाग यांची माहिती दिली. यावेळी प्रभाग निहाय रचना आणि त्यात येत असलेले भाग, परिसर यांचे पडद्यावर दाखविण्यात आले. सर्व 81 प्रभागांचे नकाशे पाहण्यासाठी संगीतसूर्य केशवरराव भोसले नाटÎगृहातील कलादालनात उपलब्ध करून देण्यात आल्याचे तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर ही उपलब्ध असल्याचे सहाय्यक आयुक्त औंधकर यांनी सांगितले. त्यानंतर सोडत काढण्याआधी चिटÎा, बरणी, ड्रम आणि रबर सर्वांना दाखवून पारदर्शीपणे सर्वाच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाचे 11 प्रभाग, नागरिकांचा मागास प्रवर्गचे 22 प्रभाग, सर्वसाधारण 48 अशा एकूण 81 प्रभागांसाठी आरक्षण काढण्यात आले.
सोडत प्रक्रिया सुरू असताना आक्षेप, हरकती, सूचना
आरक्षण सोडतीवेळी विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. सोडत काढत असताना त्यातील अनेकांनी आक्षेप, हरकती घेतल्या. सूचनाही केल्या. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी प्रारूम प्रभाग रचना आराखडा करताना लोकसंख्येचा आधार कसा घेतला?, या बद्दल विचारणा केली. माजी स्थायी समितीचे सभापती राजेश लाटकर यांनी काही प्रभागांची लोकसंख्या जास्त आहे, काहींची कमी आहे. याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उमेदवारावर अन्याय होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. माजी नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी प्रभागातील कमी लोकसंख्या आणि त्याचा आरक्षणावर होत असलेला परिणाम यावर आक्षेप घेतला. माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी अनुसूचित जातीचे प्रभाग निश्चित करत असताना अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या कशी धरण्यात आली आहे?, लोकसंख्येचा उतरता क्रम कसा धरण्यात आला आहे? हे स्पष्ट करण्याची मागणी केली. भाजपचे माजी गटनेते अजित ठाणेकर यांनी मागील आरक्षणाचा निकष लावून जे प्रभाग आता आरक्षणसाठी निश्चित केले आहेत. त्यातील अनेक भाग 2015च्या निवडणुकीपूर्वी इतर प्रभागात होते.
2015 मध्ये नवीन प्रभाग रचना झाली होती. मग 2005 आणि 2010 च्या निकषाधारे कसे आरक्षण टाकण्यात येत आहे, याबद्दलचे निकष स्पष्ट करण्याची मागणी केली. त्याचबरोबर इतर इच्छुकांसह नागरिकांनीही हरकती घेतल्या. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी नगरसेवक भूपाल शेटे, माजी स्थायीसमिती सभापती रमेश पोवार, भाजपचे माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, भाजपचे गणेश देसाई, आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, शिवसेनेचे सुशिल भांदिगरे आदी उपस्थित होते.
24 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत हरकती, सूचना पाठविण्याची मुभा
प्रभाग आरक्षण, प्रभाग रचना या बद्दलची सर्व माहिती नागरिकांसाठी ऑनलाई न आणि ऑफ लाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यांच्या हरकती सूचना असतील, त्यांनी त्या पुराव्यास महापालिकेकडे पाठवाव्यात. त्यावर सुनावणी घेण्यात येईल. जेथे त्रुटी असतील त्या दुरूस्त करण्यात येतील, असे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी स्पष्ट केले.
असे आहे प्रभाग आरक्षण
आरक्षण प्रवर्ग प्रभाग संख्या
अनुसूचित जाती 5
अनुसूचित जाती महिला 6
नागरिकांचा मागासवर्ग 11
नागरिकांचा मागासवर्ग महिला 11
सर्वसाधारण 24
सर्वसाधारण महिला 24
एकूण प्रभाग 81









