राखीव प्रभागातील उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जोडावे लागणार कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट
राज्य शासनाचा आदेश : कोल्हापूर महापालिका प्रशासनाला पाठविले पत्र
संजीव खाडे / कोल्हापूर
महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडणूक लढविणाऱया उमेदवारांना आता उमेदवारी अर्ज दाखल करतानाच जात वैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट) सादर करावे लागणार आहे. या संदर्भात राज्य शासनाने आदेश काढला असून तो कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह जिल्हाप्रशासन आणि जातपडताळणी समितीलाही पाठविण्यात आला आहे. जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या अध्यादेशाचे अधिनियमात रूपांतर न झाल्याने राज्य शासनाच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत दाखल करण्याचा नियम बंधनकारक करण्यात आला आहे.
राज्यात आगामी काळात कोल्हापूरसह नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आदी महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. वास्तविक या निवडणुका 2019 मध्ये होणार होत्या पण त्यावेळी कोरोनाचे संकट आल्याने निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची तारीख जरी जाहीर झाली नसली तरी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण सोडत झाली आहे. त्यावरील हरकती, सूचना होऊन अधिसूचनाही जाहीर झाली आहे. सध्या प्रारूप मतदार याद्यांवरील हरकती, सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रत्यक्षात निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला आणि राजकारणाला गती येणार आहे. त्याआधी सोमवारी राज्य शासनाने आरक्षित अर्थात राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱया उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाच जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश जारी केला आहे. महापलिका अधिनियम 1949 च्या कलम 5 ब मधील तरतुदीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाच उमेदवाराने जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आजवर शासनाने वेळवेळी मुदतवाढरूपी सवलत दिली आहे. याआधी दिलेली सवलतीची मुदत अधिनियम 21 नुसार 30 जून 2019 पर्यंत लागू होती. त्यामध्ये 30 जून 2020 पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. आता मात्र अध्यादेशानाचे रूपांतर अधिनियमात झाले नसल्याने आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणाऱया उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जातपडतळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक झाले आहे.
जातपडताळणी प्रमाणपत्र आधीच काढून घ्यावे लागणार
शासनाच्या आदेशामुळे आता महापालिका निवडणूक लढविणाऱया उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र निवडणुकीपूर्वी काढून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हाप्रशासन, जिल्हाधिकारी आणि जातपडताळणी समितीलाही शासनाने या संदर्भात सूचित केले आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आणि जातपडताळणी समितीला जातपडताळणी प्रमाणपत्र संबंधितांना देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे.
| आरक्षित प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्जासोबत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केल्याचा शासन आदेश महापालिकेला प्राप्त झाला आहे. शासन आदेशानुसार महापालिका कार्यवाही करेल. -डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक, कोल्हापूर महापालिका |









