प्रतिनिधी / नावली
पावसाळी पर्यटनासाठी मसाई पठारावर आलेल्या पर्यटकांचा मोटारीवरील ताबा सुटून मोटार 600 फुट खोल दरीत कोसळली. या भिषण अपघातामध्ये इचलकरंजी येथील 2 तरुण जागीच ठार झाले तर अन्य एकजण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुष्पक विद्याधर निगडे (वय 30 रा. लिगाडे माळ, इचलकरंजी), अमित सुरेश गुप्ता (वय 30 रा. शिक्षक सोसायटी, इचलकरंजी) हे ठार झाले तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी घडली.
घटनास्थळावरून मिळालेले माहिती अशी, मसाईपठाराच्या उत्तरेला वेखंडवाडी गावाच्या वरील बाजूस साळवणदरा या परिसरात मोठा कडा आहे. या परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. शुक्रवारी पावसाची रिमझिम सुरू होती. निखिल युवराज शिंगे (रा. कबनूर,) अमीत गुप्ता, पुष्पम लिगाडे हे वर्षा पर्यटनासाठी मसाई पठारावर कार घेऊन आले होते. सायंकाळी पठारावर फिरत असताना कडÎाचा अंदाज न आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कार कडÎावरून सुमारे पाचशे ते सहाशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात पुष्पम लिगाडे हे जागीच ठार झाले. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमी व मयत पर्यटकांना वेखंडवाडी येथील ग्रामस्थांनी स्ट्रेचरच्या सहाय्याने दाट झाडीझुडपातून रस्त्यावर आणले. 108 रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कोडोलीचे स. पो. निरिक्षक ए. पी. काशिद घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरु होता.
निर्मनुष्य ठिकाण
ज्या परिसरात हा अपघात घडला तो निर्मनुष्य आहे. गाडी कोसळून आवाज झाल्याने वेखंडवाडीतील ग्रामस्थांना ही घटना लक्षात आली. अन्यथा दुसऱ्या दिवशीपर्यंत अपघात कळालाच नसता.
स्थानिकांची मदत
पर्यटकांची मोटार 600 फुट खोल दरीत कोसळल्याची माहिती स्थानिक नागरीकांनीच पोलिसांना दिली. या परिसराची माहिती असणाऱया तरुणांना सोबत घेवून पोलीसांनी बचावकार्य राबविले. तासाभराच्या मदतकार्यानंतर तरुणांना बाहेर काढण्यात यश आले. यापैकी पुष्पक निगडे हा जागीच ठार झाला तर अमित गुप्ता उपचारासाठी दाखल करत असताना त्याचा मृत्यू झाला.