मराठा क्रांती मोर्चाचा महत्वपूर्ण निर्णय : ऑनलाईन बैठकीत तरुणांनी व्यक्त केला संताप
राज्य, केंद्र सरकारने श्रेयवाद सोडून आरक्षण देण्याची मागणी
संजीव खाडे / कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. राज्य आणि केंद्र सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठा युवक, युवतींमध्ये तर करिअर विषयी चिंता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुरूवारी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यातील सर्व समन्वयकांची ऑनलाईन (व्हच्युअल) बैठक झाली. यामध्ये राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यापुढे आरक्षण मिळेपर्यंत न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कोरोनाचे संकट असल्याने रस्त्यावरच्या लढाईवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन, डीजिटल आंदोलने करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी 5 मे रोजी निकाल देताना मराठा आरक्षण रद्द केले हेते. त्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमठल्या होत्या. मराठा समाजात आणि विशेष युवक, युवतींमधून प्रचंड संताप व्यक्त झाला होता. राज्य सरकारसह केंद्र सरकारचाही निषेध करण्यात आला होता. अशा तप्त वातावरणात गुरूवारी मराठा क्रांती मोर्चाची व्हर्च्युअल बैठक झाली. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या एकूण भूमिकेवर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द निकाल दिला आहे. त्यामध्ये ज्या बाबी नमूद केल्या आहेत, त्यांचा अभ्यास करून पुढील पावले उचलण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत राज्य सरकार कोणत्या बाबतीत कमी पडले, याचा अभ्यास करण्याविषयी या बैठकीत काही समन्वयकांनी सूचना केल्या. श्रेयवाद आणि हेवेदावे टाळून आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी यापुढे आपापली जबाबदारी पार पाडावी, यासाठी दबाव वाढविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. सध्या कोरोनामुळे मोर्चा, धरणे, निदर्शने, उपोषण अशी आंदोलने करण्यावर मर्यादा आल्या आहेत. पण लढा तर लढायचा आहे. कोरोनाच्या संकटात आंदोलनाची धार कायम ठेवण्याबरोबर समाजात जागृती, प्रबोधन करण्यासाठी डीजिटल आंदोलन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लवकर या संदर्भात समाजबांधवांना सुचित करण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या एका ज्येष्ठ राज्य समन्वयकाने `तरुण भारत’शी दिली.
आमच्या करिअरशी खेळ !
मराठा युवक, युवतींच्या प्रतिनिधींनी बैठकीत संतप्त भावना मांडली. आरक्षण रद्द झाल्याने आमचे करिअर संपण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारकडून आमच्या करिअरशी खेळ सुरू आहे. आरक्षण मिळेपर्यंत सर्वांनी एकजुटीने तीव्र लढा पुन्हा सुरू करूया, असेही युवकांनी सांगितले.
बीडमध्ये 16 मे रोजी मोर्चा
शिवसंग्रामचे नेते विनायक मेढे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत 15 मे रोजी राज्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर 16 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र भावना मांडल्या.








