छत्रपती शिवाजी चौकात उद्या धरणे आंदोलनाने सुरूवात
शिवाजी मंदिर येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घोषणा
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणाचा हा लढा दीर्घकाळ चालणार आहे. विविध टप्प्यावर आंदोलनाची तीव्रता आणि व्याप्ती वाढवली पाहिजे. पहिल्या टप्प्याची सुरवात शुक्रवार 28 रोजी करण्यात येणार आहे. ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौक येथे सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत धरणे आंदोलनाने संघर्षाची मशाल पेटवण्यात येणार आहे. अशी घोषणा सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली. बुधवारी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आयोजीत व्यापक बैठकीत ही घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीनिवास साळोखे होते. मराठा आरक्षण लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजीत केली होती.
यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, बाळ घाटगे, महेश जाधव, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, शिवाजी जाधव, दिलीप देसाई, ऍड. अशोकराव साळोखे, राजू सावंत, जयकुमार शिंदे, सुरेश जरग, श्रीकांत भोसले, चंद्रकांत यादव, राजेंद्र चव्हाण यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
महेश जाधव म्हणाले, आपण पहिल्यांदा मराठा असून त्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते आहोत. पक्षाचे लेबल बाजुला ठेऊन मराठा म्हणून एक व्हा असे आवाहन केले. आरक्षणाच्या लढ्यात आता मागे हटायचे नाही. ही लढाई सोपी नाही. विविध पातळ्यांवर लढा द्यावा लागणार आहे. कायदेशीर लढाई तर महत्चाची आहेच. पण राज्यकर्त्यावरही दबाव वाढवला पाहिजे. यासाठी त्यांना निवेदने देऊन लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात यावे अशी सूचना मांडली.
ऍड. बाबा इंदुलकर यांनी कायदेशीर अडचणी आणि त्यावर उपाय सांगितले ते म्हणाले, सध्याच्या रद्द झालेल्या आरक्षणावर फेरयाचिका दाखल केल्यास व पुन्हा सर्व प्रक्रिया राबविल्यास बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे तात्काळ मराठ्यांना `ओबीसी’मधून आरक्षण दिल्यास ते कायद्याच्या चौकटीत बसू शकते हा मुद्दा प्राधान्याने रेटला पाहिजे. शिवाजी मंडळाचे अध्यक्ष सुजित यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा पुढे न्यायचा आहे. राज्यभरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. आपणही आंदोलनाच्या माध्यमातून धग कायम ठेऊया. धरणे आंदोलनाने सुरवात करुन टप्प्या टप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात यावी.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकार व केंद्र सरकारने काहीही करावे परंतु मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अशी मागणी केली. समाजा म्हणून संघटीत लढा देऊया असे आवाहन केले. कॉम्रेड चंद्रकांत यादव, जयकुमार शिंदें यांनी भूमिका मांडली.
मराठा आरक्षणा लढ्याचा राजकिय वापर होऊ नये
मराठा आरक्षणाचा लढा हा पक्ष विरहीत आहे. तो कायम राहिला पाहिजे. मराठेच मराठ्यांचे शुत्रू आहेत. हे यापूर्वी दिसून आले आहे. आता सावध भूमिका घेतली पाहिजे. हा लढा पक्षविरहीतच ठेऊया जर यात राजकारण आले तर कधीच आरक्षण मिळणार नाही. अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. यास सर्वानी हात वर करुन पाठिंबा दर्शवला.









