माजी उपमहापौर भूपाल शेटे यांची माहिती ;संजय भोसले यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांच्या संपत्ती, बँक खात्याच्या चौकशीची मागणी ;अर्जासोबत दोनहजार पानांची कागदपत्रे सादर
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेतील बहुचर्चित घरफाळा घोटाळा प्रकरणासंदर्भात माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी ईडीकडे (सक्त वसुली संचालनालय) तक्रार केली आहे. तब्बल दोनहजार पानांची कागदपत्रे तक्रार अर्जासोबत जोडली आहेत. यामध्ये तत्कालीन प्रभारी कर संग्राहक व निर्धारक संजय भोसले यांच्यासह त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱयांच्या संपत्ती आणि बँक खात्याची चौकशी करावी, अशी मागणी शेटे यांनी ईडीकडे केलेल्या तक्रार अर्जात केली आहे.
दरम्यान, संजय भोसले यांनी एका राष्ट्रीयकृत बँकेचा घरफाळा बेकायदेशीरित्या कमी करून महापालिकेचे 3 कोटी 29 लाख 47 हजार 489 रूपयांचे आर्थिक नुकसान केले असल्याचा आरोप शेटे यांनी केला आहे. येत्या दहा दिवसांत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भोसले यांना बडतर्फ करून त्यांची चौकशी सुरू केली नाही तर महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा इशाराही शेटे यांनी दिला आहे.
शेटे यांनी बुधवार पत्रकार परिषद घेऊन 2003 ते 2013 या काळात महापालिकेत 100 कोटींचा घरफाळा घोटाळा झाला असल्याचा दावा केला. ते म्हणाले, संजय भोसले यांनी प्रभारी संग्राहक व निर्धारक असताना 14 कोटींचा घरफाळा घोटाळा केला आहे, ही बाब चौकशीत स्पष्ट झाली आहे. महापालिकेचे आर्थिक नुकसान करून त्यांनी प्रचंड संपत्ती मिळवली आहे. या संपत्तीतील कोट्य वधी रूपये त्यांनी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनाही दिले आहेत. त्यामुळे काही अधिकारी संजय भोसले यांनी केलेल्या महापालिकेच्या आर्थिक नुकसानीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे भोसले यांच्यासह त्यांना पाठिशी घालणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱयांची चौकशी करावी, त्यांची संपत्ती, बँक खाते तपासावेत, अशी मागणी ईडीकडे अर्जाव्दारे केली आहे. अर्जासोबत या प्रकरणाची माहिती देणारी दोनहजार कागदपत्रेही जोडली आहेत, असेही शेटे यांनी सांगितले.
बँकेच्या घरफाळा आकारणीत महापालिकेचे नुकसान
दसरा चौकातील एका राष्ट्रीयकृत बँकेचा मासिक भाडेकरार 2 लाख 37 हजार 300 रूपये असताना त्यावर संजय भोसले यांनी 45 हजार 688 रूपये मासिक घरफाळा आकारणी करून महापालिकेचे तब्बल 3 कोटी 29 लाख 47 हजार 489 रूपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. त्यांचा हा नववा घोटाळा आहे, असा दावा शेटे यांनी केला.
ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार ;संजय भोसले
शेटे यांच्या आरोपासंदर्भात प्रतिक्रिया देताना संजय भोसले यांनी सांगितले की ;घरफाळा घोटाळ्यासंदर्भातील तक्रार ईडीकडे गेली असेल तर या प्रकरणात मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाईन. स्टेट बँकेची आकारणीचे जे प्रकरण आहे ते 2009 साली मी केले होते. स्टेट बँक आणि सारस्वत संस्था यांच्याकडून मला जी कागदपत्रे प्राप्त झाली. त्या कागदपत्राच्या आधारे मी लागू केलेली कर आकारणी योग्यच आहे. तथापि 2016 मध्ये ही कर आकारणी रिवाईज करताना कागदपत्रांची तपासणी करणे अपेक्षित होते. पण तत्कालीन करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे तानाजी मोरे आणि अशोक पवनीकर यांनी कोणतीही खातरजमा न करता मागील पानावरून पुढे याप्रमाणे आहे. तशी कर आकारणी ठेवली. त्याला मी जबाबदार नाही. त्यामुळे घरफाळा घोटाळ्यातील आरोपावरून माझी ईडीकडे चौकशी झाली तरी मी त्याला सामोरे जाईन. या चौकशीत सत्य समोर येईल आणि खरे दोषी आहेत त्यांच्या विरूद्ध कारवाई होईल, यावर माझा विश्वास आहे, असेही भोसले यांनी सांगितले.