प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात शहरातील मंडळांना चार फुटांपर्यंतचीच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे बंधनकारक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महिन्याभरापूर्वी मूर्तीच्या उंचीबाबतचा नियम जाहीर केला आहे. त्यामुळे मूर्तीकारांना 4 फुटांशिवाय अन्य उंचीच्या गणेशमूर्तीचे मंडळांस वितरण करता येणार नाही. जे मंडळ मुख्यमंत्र्यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन उंच मूर्ती स्वीकारतील, त्यांना रस्त्यावरच अडविले जाणार आहे. तेव्हा मूर्तीकारांनी सावधपणे मंडळांशी गणेशमूर्तीबाबतचा व्यवहार करावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी गुरुवारी केले.
गणेशमूर्तीची ऑर्डर दिलेल्या घरगुती गणेशभक्त व मंडळांना 15 ऑगस्टपासून पुढील 5 दिवस अगोदर मूर्ती नेण्याचे आवाहन करावे. तसेच तिघेच मूर्ती नेण्यास यावे, अशीही सुचना सर्वांना करा. असे केल्यानेच गर्दीवर नियंत्रण राहून मूर्तीकार व गणेशभक्त कोरोनाच्या धोक्यापासून सुरक्षित राहतील, असे शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले. उंच गणेशमूर्ती व कुंभार गल्ल्यांमध्ये मूर्ती नेण्यासाठी होणारी गर्दी टाळणे हा मुद्दा घेऊन पोलीस प्रशासन व गणेश मूर्तीकार यांच्यात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मर्ल्टीपर्पज हॉलमध्ये बैठक झाली. यावेळी फुलेवाडी, धोत्री गल्ली, गंगावेस, दत्त गल्ली, पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभारगल्ली, बापट पॅम्प येथील दीडशेवर मूर्तीकार उपस्थित होते. 22 ऑगस्टपासून सुरु होणाऱया गणेशोत्सवात कोरोनाच्या धोक्याशी लढावे लागणार आहे. सोशल डिस्टसिंग पाळले नाही तर मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढणार आहे, असे सांगून प्रेरणा कट्टे म्हणाल्या, दरवर्षी गणेशमूर्ती घरी व मंडळाच्या ठिकाणी नेण्याच्यानिमित्ताने शहर व परिसरात 6 ते 7 गणेशभक्त रस्त्यावर असतात. यंदा असे होऊ न देण्याचे आपल्या हातात आहे. तेव्हा गणेशभक्त मूर्ती नेण्यास 21 व 22 रोजी येण्याऐवजी त्यांना 15 ते 19 ऑगस्ट या दरम्यानच बोलवा, असेही कट्टे यांनी मूर्तीकारांना सांगितले. पोलीस प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही मूर्तीकारांनी सांगितले.
बैठकीला शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीचे बबन वडणगेकर, संत गोरा कुंभार मूर्तीकार संघाचे अध्यक्ष संभाजी माजगावकर, औद्योगिक सोसायटीचे चंद्रकांत गोरंबेकर, संजय कुंभार, यशोदा माजगावकर, द्वारकानाथ पुरेकर, तुकाराम वडणगेकर, शंकर पुरेकर ,दत्तात्रय निगवेकर, सुनील माजगावकर, उदय पुरेकर व विनायक माजगावकर उपस्थित होते.
आवाहनाचेफलक
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संत गोरा कुंभार मूर्तीकार संघाने गणेशमूर्ती लवकर नेण्यासाठीचे आवाहन करणारे फलक उभारले आहेत. बापट पॅम्पमधील कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटी, शाहू सांस्कृतिक भवन, पापाची तिकटी आदी ठिकाणी हे फलक पहायला मिळतील, संघाचे अध्यक्ष संभाजी माजगावकर यांनी सांगितले.