धामोड / वार्ताहर
लॉकडाऊन काळात भरमसाठ आलेली विद्युतबिले माफ करण्याची मागणी धामोड ग्रामस्थांनी केली . शिरगांव उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता अक्षय तंगसाळे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले असून याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोना संकटामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. छोटे -मोठे व्यवसाय, उद्योगधंदे, कुटिरोद्योग बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच विद्युत वितरण कंपनीने भरमसाठ विजबिले पाठवून ग्राहकांना ‘ शॉक ‘ दिला आहे . मार्चपासूनची बिले थकबाकी स्वरूपात आल्याने देयकाचा आकडा मोठा आहे . आर्थिक मंदीच्या काळात एवढी रक्कम कोठून भरायची ? या विवंचनेत सध्या ग्राहक आहेत . संबधित बिले माफ करावीत अन्यथा आंम्ही हि बिले भरणार नाही असा पवित्रा ग्राहकांनी घेतला आहे . शिवाय या कारणास्तव संबधित विभागाने ग्राहकांची कनेक्शनही तोडू नयेत असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन शिरगांव उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता अक्षय तंगसाळे यांना देण्यात आले आहे . निवेदनावर अनिल चौगले , शंकर पाटील , माजी ग्रा.पं.सदस्य गणपती धामोडकर ,वसंत गायकवाड , सागर ताकतोडे ,बाळासो कांबळे , भिकाजी कांबळे , आनंदा कांबळे, नागेश कांबळे आदीसह ग्राहकांच्या सह्या आहेत . स्विकारण्यात आलेले लेखी निवेदन व ग्राहकांच्या भावना वरिष्ठ पातळीवर कळविल्या जातील असे आश्वासन तंगसाळे यांनी यावेळी ग्राहकांना दिले.
Previous Articleभारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पद्मावती यांचे निधन
Next Article कोल्हापूर : कोरोना मृतदेहासह तीन तास आंदोलन









