कोरोना नियमावलीमुळे आदमापुरात शुकशुकाट, कोट्यावधीची उलाढाल ठप्प
प्रतिनिधी / सरवडे
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा राज्याचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर ( ता .भुदरगड ) येथील सदगुरू बाळूमामांचा भंडारा उत्सव पुजारी व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने पार पडला. कोरोनामुळे सलग दुसऱ्याही वर्षी भंडारा यात्रा रद्द झाल्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट होता. कोरोनामुळे यात्रा रद्द झाल्याने भाविकांनी उपस्थित राहू नये या आवाहनाला भक्तांनी प्रतिसाद दिला . त्यामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत भंडारा सोहळा संपन्न झाला.
श्री. सदगुरु बाळूमामांच्या नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेला देवस्थानचे पुजारी व मोजकेच ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत जागर झाला. बाळूमामांची सालकृंत महापूजा बांधली. बाळूमामांच्या गाभाऱ्यात जरबेरा फुलांनी आकर्षक सजावट केली होती. मंदिरास नेत्रदिपक विद्युत रोषणाई करुन मंदिराचा मंडप दीपमाळ विद्युत रोषणाईने उजळू निघाला होता. तसेच मंदिरासमोर आकर्षक रांगोळी काढली होती. सकाळी पहाटे पाच वाजता आरती होऊन भंडारा उत्सवाची सांगता झाली. पोलिस व सुरक्षा रक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
प्रतिवर्षी सदगुरू बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठया उत्साहात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात संपन्न होत असतो. पहाटे बाळूमामांच्या बकऱ्यांच्या सोळा कळपामधून दूध आणून अभिषेक घालण्यात येतो. या भंडारा उत्सवाला अनेक ठिकाणा वरून भाविक चार दिवस अगोदरच मंदिर पारिसरामध्ये येत असतात. त्याच बरोबर मंदिरा मध्ये भाकणूक देखील होते व बाळूमामांची पालखी ढोल कैचाळाच्या गगनभेदी आवाजात गावातून भंडारा उधळत गावातील प्रमुख मार्गावरुन शोभायात्रा काढली जाते. मात्र मागील व या वर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द केल्याने भक्तांना सुख सोहळा पाहावयास मिळाला नाही.
कोट्यावधीची उलाढाल ठप्प
आदमापूरच्या भंडारा यात्रेला विविध राज्यांतून लाखो भाविक उपस्थिती लावत असतात. गेल्या व यावर्षी यात्रा रद्द केल्याने या यात्रेत होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. तर भक्तांना या यात्रेचा आनंद मिळाला नाही. गतवर्षी यात्रा रद्द झाल्याने यावर्षी मोठी यात्रा भरण्याचे संकेत होते परंतु कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने शासनाच्या आदेशानुसार गुढीपाडव्यापर्यंत सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. भाविकांनी ग्रामस्थ व मंदिर समितीच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल मंदिर समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम व सरपंच विजय गुरव यांनी आभार व्यक्त केले.
Previous Articleदादर भाजी मार्केटमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली
Next Article चिंताजनक! 24 तासात 1.31 लाख बाधितांची नोंद









