प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र सरकारने इंधनावरील मूल्यवर्धीत करात 2 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किमतीत प्रत्येकी दोन रुपयांची वाढ सोमवारपासून करण्यात आली आहे. बेळगाव व कोल्हापूरच्या दराचा विचार केल्यास बेळगावपेक्षा पेट्रोल 6 रुपयांनी तर डिझेल 2.57 पैशांनी महागले आहे. इंधनाच्या दरात बचत होत असल्याने वाहनचालकांचा ओढा बेळगाव जिल्हय़ातील पेट्रोलपंपांकडे आहे. याचा फटका कोल्हापूर सीमावर्ती भागातील पेट्रोलपंप चालकांना बसत आहे.
कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने इंधन दरवाढीचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून संपूर्ण राज्यभरात पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी कर्नाटकपेक्षाही महाराष्ट्रामध्ये इंधनाचा दर कमी होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच व आर्थिक गणित कोलमडताच राज्य सरकारने इंधन दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी बेळगावमध्ये पेट्रोलचा दर 73.57 रुपये तर डिझेलचा दर 66.02 रुपये इतका होता. बेळगाव शेजारील चंदगड तालुक्मयात पेट्रोलचा दर 6 रुपयांनी तर डिझेलचा दर 2.57 रुपयानी वाढलेला होता. कागल, गडहिंग्लज, चंदगड या सीमावर्तीय भागातील पेट्रोल पंपांवर दरवाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचा ओढा बेळगावमधील पेट्रोलपंपांकडे वाढला आहे. सध्या सुरू असणारी ट्रान्स्पोर्टची वाहने इंधन भरण्यासाठी बेळगाव जिल्हय़ातील पेट्रोल पंपांवर गर्दी करू लागली आहेत.
1 जूनचा पेट्रोलचा दर पुढीलप्रमाणे.
| शहराचे नाव | पेट्रोल दर | डिझेल दर |
| कागल | 78.62 | 67.53 |
| चंदगड | 79.6 | 68.59 |
| गडहिंग्लज | 79.33 | 68.21 |
| बेळगाव | 73.57 | 66.02 |









