कुदनूरच्या तरुणाचा अपघाती मृत्यू, ‘त्या’ तरुणाची ‘एक्झिट’ चटका लावणारी
प्रतिनिधी/कुदनूर
कुदनूर (ता. चंदगड) येथील अनिल यशवंत बामणे (वय ३२) हा तरुण बुधवार दि. १२ रोजी रात्री ८.३० पासून बेपत्ता झाला होता. या घटनेचा तपास कोवाड पोलिसांकडून सुरू होता. अखेर त्याचा मृतदेह तीन दिवसांनी शनिवारी दुपारी २ च्या सुमारास चिंचणे गावच्या हद्दीत ताम्रपर्णी नदीपात्रात आढळून आला. गावातील कोणतेही कार्य असो हिरीहिरीने भाग घेणारा अन् अबाल-वृद्धांसह मोठा मित्रपरिवार असलेल्या अनिलची ‘एक्झिट’ चटका लावणारी ठरली. त्याच्या अपघाती मृत्युमुळे कुदनूर गावासह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अनिल हा गोव्यातील एका नामवंत औषध निर्माता कंपनी नोकरीला होता. तो गणेशोत्सवासाठी गोव्यावरून तिलारीमार्गे आपल्या मूळ गावी कुदनूरला येत होता. मी कोवाडमध्ये आलोय… दहा मिनिटात घरी पोहोचतोय… मी आल्यावर सर्वजण जेवण करूया… असा अखेरचा संवाद अनिलने आपल्या घरी बुधवार दि. १२ रोजी रात्री ८.३० वाजता साधला होता. त्यानंतर अनिलशी कोणाचाच संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी आणि मित्रमंडळींनी त्याची शोधाशोध सुरू केली. याशिवाय कोवाड पोलिसांनाही या घटनेची कल्पना देण्यात आली. कोवाड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अनिलच्या मोबाईलचे ठिकाण दुंडगे ते कुदनूर दरम्यानचे आढळून आले. त्याअनुषंगाने शोध घेतला असता दुंडगे पुलावर पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. अनिलचा दुंडगे पुलावर दुचाकीवरून अपघात झाला असावा असा कयास लावत पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने ताम्रपर्णी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली.
शोधमोहिमेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी तपासाचे कोणतेच धागेदोरे हाती लागले नाहीत. मात्र, शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन पथकाला अनिलची बॅग राजगोळी हद्दीच्या नदीपात्रात सापडली. अखेर पोलीस आणि बचाव पथकाचा संशय बळावला की, अनिल ताम्रपर्णीतच बुडालाय. त्यानुसार यांत्रिक बोटीने शोधमोहीम गतिमान केली असता शनिवारी दुपारी २ च्या सुमारास अनिलचा मृतदेह चिंचणे हद्दीतील ताम्रपर्णीच्या पात्रात आढळला. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अनिलवर शनिवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
ताम्रपर्णीत तपास पथकाची जोखीम
कोवाड पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार अनिलचा ताम्रपर्णी नदीत शोध सुरू केला. साहाय्यक फौजदार हणमंत नाईक, संतोष साबळे, अमर सायेकर, अभिजित चव्हाण, कृष्णा भिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपाद सामंत, पांडुरंग माईनकर, विशाल परब, अजय सातार्डेकर, अमर कोले, रामदास पाटील, संतोष धुरी, युवराज नौकुडकर, शुभम पाटील, गजानन मोहनगेकर, हवालदार स्नेहा, संपदा प्रभळकर, प्रमिला पाटील, प्रा. एस. एन. पाटील यांनी जोखीम पत्करत चारच दिवसापूर्वी महापूर आलेल्या ताम्रपर्णीच्या मोठ्या पात्रात संततधार पावसाचा अडथळा स्विकारत यशस्वी शोधमोहीम राबविण्यात आली.
दुंडगे पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
ताम्रपर्णीवरील दुंडगे पुल कुदनूरसह राजगोळी परिसराला कोवाडकडे वाहतूक करण्यासाठी सोयीस्कर झाला खरा. मात्र, या पुलाच्या रुंदीने अनेक जीवघेण्या वाहतुकीला चालणा दिली. या पुलाच्या बांधणीला सुरुवातीपासूनच अनेक विरोध झाले. मात्र, त्या विरोधाला डावलून हा पुला उभा राहिला आणि अपघाताची मालिका या पुलावर सुरू झाली. अपघात तसेच पुलाच्या धोकादायक स्थितीवरून अनेक संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली. आंदोलकांची दखल घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासने दिली. अनिलच्या अपघाती मृत्युमुळे पुन्हा दुंडगे पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.









