प्रतिनिधी/सरवडे
कागल तालुक्यातील बिद्री येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा खुरप्याने वार करुन खून केल्याची घटना घडली. सोमवारी (दि.१७) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून मारुती आनंदा बारड (वय-३८) असे मयताचे नाव आहे. तर संशयित आरोपी मोहन आनंदा बारड याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
याबाबत मुरगूड पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, मारुती व मोहन हे दोघे सख्खे भाऊ आई वडीलासह बिद्री येथे राहतात. त्यांचे मुळ गाव राधानगरी तालुक्यातील बारडवाडी असून वडील व्यवसायाच्या निमित्ताने गेली चाळीस वर्षे बिद्रीत भाड्याने राहतात. या दोघा भावात कौटुंबिक वादातून वारंवार भाडंणे होत होती. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. गावातीलच मारुती महिपती चौगले यांच्या सोनारकी नावाच्या शेतातील घरामध्ये मोहन याने मारुती बारड याच्यावर रागाच्या भरात खुरप्याने वार केले.
यामध्ये मारुतीच्या छातीवर डाव्या बाजूस वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद पोलिस पाटील रमेश महादेव ढवण यांनी मुरगूड पोलिसांत दिली असून संशयित आरोपी मोहन बारड याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सपोनि विद्या जाधव करत आहेत.
Previous Articleराम मंदिराबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मुक्त पत्रकार अटकेत
Next Article ‘या’ राज्यातील सरकारी नोकऱ्या आता केवळ स्थानिकांनाच









