बांबवडे / वार्ताहर
कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे ता. शाहूवाडी येथील मध्यवर्ती चौकात रविवारी रात्री अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना केली. शिवभक्तांनी पुतळा उभारल्याची खबर सोमवारी सकाळपर्यंत कोणालाही नव्हती. त्यामुळे या गनिमी काव्याची तालुकाभरात चर्चा होती. दरम्यान, परवानगी घेऊन पुतळा बसवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर आता बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये, आम्ही संरक्षण करु, या भूमिकेवर शिवभक्त ठाम आहेत.
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गालगत असणाऱ्या बांबवडे गावात अद्याप एकही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. त्यामुळे गावातील मध्यवर्ती चौकातील काँक्रीटच्या चबुतऱ्यावर नागरिकांना रविवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना केली. रविवारी रात्रीपर्यंत याठिकाणी केवळ भगवा ध्वज फडकत होता. प्रशासनाच्या परवानगीशिवाय अज्ञातांनी हा पुतळा उभारला आहे. त्यामुळे हा पुतळा हटवून पुन्हा परवानगी घेऊन पुतळा बसवावा, असे प्रशासनाचे मत आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत पुतळा हटवू नये. आम्ही या पुतळ्याचं संरक्षण करु, अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली आहे. तसेच पुतळ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, पंचायत समिती उपसभापती विजय खोत, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी, बांबवडे शहरप्रमुख सचिन मुडशिंगकर आदींनी घटनास्थळी धाव घेत शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
घटनास्थळापासून पन्नास मीटर अंतारवार असणाऱ्या पोलीस दूरक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही याची माहिती नव्हती. त्या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावण आहे. कायदा सुव्यवस्था निर्माण हाऊ नये यासाठी प्रांताधिकारी अमीत माळी, तहसीलदार गुरू बिराजदार, पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन पाहणी केली. तसेच जादा कूमक मागवून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
Previous Articleउत्तर प्रदेश : माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांची कोरोनावर मात
Next Article बेळगावच्या दुसऱ्या रेल्वेगेटचा लोखंडी खांब कोसळला









