सिटुच्या आंदोलनाला यश
आवळी बुद्रुक / प्रतिनिधी
बांधकाम कामगारांना कोविड अनुदान ३ हजार रूपये देण्याचा निर्णय खा.शरद पवार तसेच सिटुचे राज्य अध्यक्ष डॉ. जी. एल. कराड यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतला.
महाविकास आघाडी सरकारने कामगार हिताचे निर्णय घेऊन कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी खा. शरद पवार यांनी प्रयत्न करावेत याकरीता सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल.कराड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शिष्टमंडळ भेटुन चर्चा केली होती. त्या अनुषंगाने आज शरद पवार यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे कामगार मंत्री वळसे-पाटील, सिटुचे राज्याध्यक्ष डॉ. कराड तसेच अन्य कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये राज्यातील कामगारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत व कामगारांना न्याय द्यावा अशा सूचना खा. शरद पवार यांनी ना. वळसे-पाटील यांना दिल्या. त्या अनुषंगाने कामगार मंत्री वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून बांधकाम कामगारांना तीन हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
बांधकाम कामगारांना अनुदान पंधरा हजार रुपये कोविड अनुदान द्या या मागणीसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटना (सिटु)ने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने केली होती. याशिवाय मुख्यमंत्री, कामगार मंत्री यांच्यासोबत या मागणीसंबंधी पत्रव्यवहार सुद्धा केले होते.
आज झालेल्या बैठकीत असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ ,बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य,घर कामगारांची नोंदणी व त्यांच्या योजना ,यंत्रमाग-ऊसतोड कामगार- रिक्षाचालक व हाकर्स याचेसाठी मंडळाची स्थापना, स्थलांतरित कामगार कायद्याची अंमलबजावणी ,कामगार विषयक त्रिपक्षीय समित्यांचे गठण, केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण इत्यादी मुद्द्यावर विस्ताराने चर्चा झाली.
या बैठकीला सिटुचे राज्यअध्यक्ष डॉ.डी एल कराड, विश्वास उटगी, संजय वढावकर, एम.ए.पाटील, दिवाकर दळवी आदी उपस्थित होते.
अशी माहिती लाल बावटा संघटनेते जिल्हा अध्यक्ष कॉ.भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉ.शिवाजी मगदूम राधानगरी तालुका अध्यक्ष कॉ. संदीप सुतार यांनी दिली.