2 हजारच्या 17 नोटा जप्त, बँकेला गंडा घालण्याचा प्रयत्न, कॅशियरच्या चाणाक्षपणामुळे उघड
प्रतिनिधी / कोल्हापूर
बनावट नोटा छापून त्या राष्ट्रीयकृत बँकेत खपविणाऱ्या दोघा तरुणांना राजारामपुरी पोलीसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 2 हजारच्या 17 नोटा, प्रिंटर, टिव्ही, कागद पोलीसांनी जप्त केला. अनिकेत अनिल हळदकर (वय 24 रा. चंद्रे, राधानगरी), उत्तम शिवाजी पोवार (रा. पालकरवाडी, पो. कसबा वाळवा ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद चंद्रकांत बसाप्पा गुडसकर (वय 60 रा. संभाजीनगर) यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत गुडसकर हे राजारामपुरी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये प्रबंधक म्हणून नोकरीस आहेत. सोमवार दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास बँकेतील कॅशियर रमेश मोहिते यांच्याजवळ अनिकेत हळदकर खात्यावर पैसे भरण्यासाठी आला. त्याने आपल्या खात्यावर 2 हजारच्या 67 नोटा असे 1 लाख 34 हजार रुपये भरले. यानंतर अरुण कांबळे हे खात्यावरील 2 लाख रुपये काढण्यासाठी बँकेत आले. यावेळी कॅशियर रमेश मोहिते यांनी पैसे मोजण्यासाठी घेतले असता 67 पैकी 17 नोटा एकाच सिरीयलच्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच 16 नोटांवर पाचशेचा वॉटरमार्क तर 1 नोटेवर 200 रुपयांचा वॉटरमार्क असल्याचे दिसून आले. मोहिते यांनी याची माहिती बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. या 17 नोटा बनावट असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अनिकेत हळदकर यास पुन्हा बँकेत बोलावून घेतले. यानंतर रिझर्व्ह बँकेच्या प्रोसिजर नुसार या 17 नोटा जप्त करुन घेतल्या व याची रितसर माहिती राजारामपुरी पोलीसांना दिली. राजारामपुरी पोलीसांनी अनिकेत हळदकर याला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या नोटा उत्तम पोवार याने तयार केल्याची कबूली दिली. यानंतर राजारामपुरी पोलीसांनी या दोघांना अटक केली.
17 नोटा एकाच सिरीयल नंबरच्या
2 हजारच्या 67 नोटांपैकी 17 नोटा एकाच सिरीयल नंबरच्या होत्या. तर 16 नोटांवर दोनशे रुपयांचा वॉटरमार्क तर एका नोटेवर 500 रुपयांचा वॉटरमार्क असल्याचे दिसून आले. यामुळे बँकेचे कॅशियर मोहिते यांच्या निदर्शनास ही बाब आली.
उच्च शिक्षीत संगणक तज्ञ
उत्तम पोवार व अनिकेत हळदकर हे दोघे शालेय मित्र आहेत. उत्तम पोवार हा उच्च शिक्षीत असून तो संगणक तज्ञ आहे. त्याच्या पालकरवाडी येथील शेतातील घरामध्ये या दोघांनी बनावट नोटा तयार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीसांनी या ठिकाणी छापा टाकून प्रिंटर, कागद, एलईडी टिव्ही असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अनिकेतच्या घरी अर्थ मुव्हींगचा व्यवसाय असून त्याचाच हप्ता भरण्यासाठी तो बँकेत आला होता.
नोटांची छपाई वर्षभरापासून सुरु
अमित व अनिकेत यांनी गेल्या वर्षभरापासून बनावट नोटा छापल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. गेल्या वर्षभरात या नोटा कोण कोणत्या ठिकाणी खपविल्या, त्यांच्यासोबत आणखी कोण कोण आहे. याची माहिती पोलीस घेत आहेत.









