प्रतिनिधी / कोल्हापूर
आपल्या नावापुढे `बॅकर्वड’ शब्द लागेल अशी भीती बड्या मराठा नेत्यांना आहे. त्यामुळेच गेले १५ वर्षे त्यांची सत्ता असताना मराठा समाजाला आरक्षण दिले गेले नाही, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांवर केला आहे. आपला समाज केवळ आपल्यामागे फरफटत यावा, असेच यातील अनेकांची इच्छा आहे. त्यामुळेच सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून मराठा आरक्षणावर राज्यात भाजप आक्रमक होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुळात राज्यातील बड्या मराठा नेत्यांना समाजाला आरक्षण द्यायचंच नाही. त्यांच्या भूमिकेत खोट आहे. त्यांच्या इशाऱ्यावरच सरकार चालत असल्याने निर्णय होत नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले तर मुलं शिकतील मोठी होतील, नोकरी लागले. समाजाची प्रगती होईल. एका आरक्षणामुळे समाजाचा विकास झाला तर आपल्या पाठीमागे येणार कोण ? त्यांचं राजकारण चालण्यासाठी त्यांना समाजातील मुलं रिकामी राहिली पाहिजेत, असा आरोप देखील पाटील यांनी केला आहे.
13 टक्के राखीव जागा ठेवणे चूक ठरेल.
आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक झाला असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस भरतीची घोषणा करून आपण मराठा समाजातच्या विरोधात आहोत हे दाखवून दिले आहे. चूक लक्षात आल्यानंतर 13 टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा करुन सारवासरव करण्याचा प्रयत्न झाला. मात्र कायद्याने तसे करता येणार नाही. यात मराठा समाजाचा घात होणार आहे, असं पाटील यांनी म्हटले आहे.
या सरकारचे सल्लागार कोण हेच समजत नाही. १३ टक्के मराठ्यांना आरक्षण ठेवून भरती केली तरी नंतरही १३ टक्क्यांमध्ये सर्व आरक्षणे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत भरती स्थगित करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.








