कोरोनामुक्ती नंतर पोलीस निरीक्षकांनी केला प्लाझ्मा दान
प्रतिनिधी / कोल्हापूर
वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे सेवा बजावत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यामुळे त्यांच्या वृध्द आईलाही कोरोनाची लागण झाली. १५ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोघेही कोरोनामुक्त झाले. काळे यांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन सोमवारी आपला प्लाझ्मा दान केला. दोन कोरोना बाधीतांवर त्यामुळे उपचार होणार आहे. काळे यांच्या सामाजिक बांधिलकीला सलाम केला जात आहे.
किणी टोल नाक्यावर बंदोबस्त करीत असताना काळे यांना कोरोनाची बाधा कधी झाली हे समजलेच नाही. त्यांनी तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या वृध्द आईलाही बाधा झाली होती. दोघांवर १५ दिवस उपचार झाल्यानंतर ते खडखडीत बरे झाले. आपल्या प्लाझ्मामुळे दोन कोरोना बाधित बरे होतील या सामाजिक कर्तव्यामुळे काळे यांनी सोमवारी सीपीआर रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान केला. मंगळवारी विसर्जन मिरवणूकीच्या बंदोबस्तातही काळे सहभागी होणार आहेत. त्यांच्या या कर्तव्य निष्ठतेबद्दल लोकातून कौतूक केले जात आहे.









