राजू शेट्टींसह शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतल्याने तणाव
प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दाभोळक कॉर्नर येथे रास्तारोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांना ताब्यात घेत असताना पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाल्याने तणाव निर्माण झाला होता. अखिल भारतीय किसना संघर्ष समितीचे समन्वय माजी खासदार स्वाभिमानीचे संस्थापाक यांच्यांच्यासह आंदोलकांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले. या कायद्याच्या विरोधात देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत. चाळीसहून अधिक दिवस दिल्लीच्या सिमेवर पंजाब, हरियानातील शेतकरी ठाण मांडून आहेत. केंद्र सरकारशी होत असलेल्या चर्चेतून मार्ग निघत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस आंदोलनाची व्याप्ती वाढू लागली आहे. शनिवारी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दाभोळकर कॉर्नर येथे किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने रास्तारोको करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने दाभोळकर कॉर्नरवरील शिग्नलजवळ वाहतूक कोंडी झाली. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. पोलिसांनी बळाचा वापर करीत राजू शेट्टी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेत असताना जोरदार झटापट झाली. बंदोबस्तात आंदोलकांना ताब्यात घेवून शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तणाव निवळल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.









