पेठ वडगाव / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर आहे. यामुळे पेठ वडगाव परिसरात कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या बाबत खासदार धैर्यशील माने यांनी वडगाव परिसरात कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु होण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
हातकणंगले तालुक्यातील पश्चिम भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या भागातील नागरिकांना तालुक्यातील अतिग्रे व हातकणंगले येथील कोविड केंद्रावर उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी प्रचंड रुग्ण वाढले असून तेथील यंत्रणेवर ताण आला आहे. याचबरोबर कोरोना रुग्णांचीही यामुळे परवड सुरु आहे.
सध्याच्या परिस्थितीत हातकणंगले तालुक्यातील पश्चिम भागातील पेठ वडगाव व परिसरातील सर्व गावातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने पेठ वडगाव परिसरात कोविड सेंटर लवकरात लवकर सुरु होणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी यांनी सध्याच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून पेठ वडगाव परिसरात कोविड केंद्र सुरु करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली. हे निवेदन माजी उपनगराध्यक्ष अजय थोरात, संतोष गाताडे, उपनगराध्यक्ष शरद पाटील, संदीप पाटील, संतोष चव्हाण, कालिदास धनवडे आदीसह यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केले. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हा प्रशासनास संपर्क साधून कोविड सेंटर सुरु होण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हा प्रशासनास केल्या.