प्रतिनिधी/वडगाव
येथील नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी नगरसेविका अलका शरद गुरव यांची तर उपसभापतीपदी मैमून शमशुद्दीन कवठेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड पिठासन अधिकारी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केली.
येथील नगरपालिकेच्या स्वर्गीय विजयसिह यादव सभागृहात स्थायी समिती व विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडीसाठी नगराध्यक्ष तथा पिठासन अधिकारी मोहनलाल माळी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.यावेळी स्थायी समितीच्या पदसिध्द सभापती नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या नियंत्रणाखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली.
सत्ताधारी म्हाआघाडीच्या नेत्या प्रविता शिवाजीराव सालपे यांनी सुचविलेल्या प्रमाणे नगरसेविका अलका गुरव यांचे नाव सभापती पदासाठी नामनिदर्शन पत्र दाखल करण्यात आले.या पदासाठी अन्य नामनिर्देशन पत्र न आल्याने नगराध्यक्ष तथा पिठासन अधिकारी माळी यांनी अलका गुरव यांचे महिला व बाल आरोग्य समितीच्या सभापती पदी तर उपसभापती मैमून कवठेकर, सदस्या सावित्री घोटणे, शबनम मोमीन यांची बिनविरोध निवड घोषित केली. उपसभापती मैमुन कवठेकर यांना दुसर्यांदा संधी मिळाली आहे. दरम्यान स्थायी समितीवर पदसिद्ध सभापती नगराध्यक्ष मोहनलाल माळी, सदस्य उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, सदस्या नूतन महिला व बाल कल्याण समिती सभापती अलका गुरव यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. आभार मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी मानले.