प्रतिनिधी/पेठ वडगाव
वडगाव पालिकेचे नगरसेवक दीपक खरोशे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा आज राजीनामा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला. युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी नगरसेवक पदासाठी दिलेल्या कालावधी संपल्यानंतर दीपक खरोशे यांनी हा राजीनामा दिला.
पेठ वडगाव पालिकेच्या सताधारी युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी दीपक खरोशे यांना संधी दिली होती. नगरसेवक पदासाठी संपलेल्या कालावधी नंतर खरोशे यांचा राजीनामा कधी सादर होणार व यानंतर कोणाची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागणार याची उत्सुकता युवक क्रांती महाआघाडीच्या कार्यकर्त्यांत लागून राहिली होती. आज खरोशे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर पुढील स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मंगरायाची वाडी भागातील कार्यकर्ते दशरथ खोत यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे या पदाचा मान मंगरायाची वाडीला मिळणार असल्याने मंगरायाची वाडी येथील महाआघाडीच्या कार्यकर्त्यातून समाधान व्यक्त होत आहे.









