वडगावात म्युकर मायकोसिसचा पहिला बळी
प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे कोरोनाची दाहकता नागरिक अनुभवत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी मृत्यू दर वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. भादोले, किणी, सावर्डे, मिणचे, या गावामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
कोरोनानंतर आता पेठ वडगाव शहरात म्यूकर मायकोसिसने एका रुग्णाचा मृत्यू झाला. भादोले येथे शनिवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर अंबप येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. मिणचे येथे पती पत्नीचा कोरोनाने एका तासाच्या अंतरावर एकाच दिवशी मृत्यू झाला. भादोले येथे कोरोना रुग्णांचा मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे. मिणचे येथे एका तासाच्या अंतरावर पती पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मिणचे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडगाव परिसरात एका पाठोपाठ मृत्युच्या बातमीने नागरिकात भीतीचे वातावरण झाले होते. पेठ वडगाव शहरातील म्यूकर मायकोसिस पुरुष रुग्णाचा डोळे निकामी झाल्याने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वडगाव शहरात शनिवारी अकरा कोरोना रुग्णांची भर पडली. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या २९१ झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२० तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६६ आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ आहे. वडगाव शहरात रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत चालल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. तर प्रशासनाने नियमांच्या कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.









