प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव शहरात कोरोनाने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील सामाजिक संस्था, नागरिक, मंडळे, नागरीक व व्यापारी यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूची मागणी मुख्याधिकारी यांचेकडे केली होती. या मागणीनुसार मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी प्रशासनाच्यावतीने सोमवार दि. ७ ते १६ सप्टेबर पर्यंत दहा दिवसाचा जनता कर्फ्यू लागू केला असल्याची माहिती दिली.
दरम्यान सहा महिन्यात मेटाकुटीस आलेल्या छोट्या- छोट्या व्यावसाइकांच्या रोजी रोटीच्या दृष्टीने हा जनता कर्फ्यू योग्य नाही. प्रशासनाने व्यवसायाची वेळ कमी करावी पूर्णतः बंदचा निर्णय घेवू नये असे पत्रक व्यापार्यांनी काढले आहे. जनतेसाठी अत्यावश्यक असलेल्या बँका, पतसंस्था, विमा कार्यालयेही दहा दिवस बंद ठेवणे योग्य नसल्याचे या क्षेत्रातील लोकातून मत व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना मुख्याधिकारी सुषमा कोल्हे म्हणाल्या, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ३४ तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ३७ (३) चे आदेशास अनुसरुन कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. तसेच वडगांव शहरामधील सर्व प्रभागामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊन समुह संसर्गा मध्ये वाढ होत असलेचे दिसून येत असलेमुळे शहरामधील सामाजीक संस्था, मंडळे, नागरीक व सर्व व्यापार्यांनी कोरोना संसर्गामध्ये वाढ होत असलेली साखळी तोडणेसाठी वडगांव शहरामध्ये जनता कफ्यू लागू करुन संपूर्ण व्यवहार बंद ठेवणे गरजेचे असल्याबाबत मॅसेजद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. त्यास अनुसरुन शहरामधील अत्यावश्यक सेवेमध्ये दुध डेअरी सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत तसेच दुध पाकीट सलग्न बेकरी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत चालू राहणार.
मेडीकल, शेती विषयक भाडांर केंद्र तसेच सर्व खाजगी सार्वजनिकर वैद्यकीय सेवा, पशुचिकीत्सालय आदी वगळून सोमवार दि.७ ते १६ अखेर दहा दिवस जनता कर्फ्यू लागू करणेत आला आहे. या कालावधीमध्ये शंभर टक्के संपूर्ण व्यवहार बंद ठेवणेत येत आहेत. पेट्रोल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहना करीता चालू राहिल. अंत्यविधीच्या कार्मक्रमाकरीता दहा नागरिकांना उपस्थित राहता येईल. या बंदमध्ये बँका, पतसंस्था, विमा कंपन्याही बंद राहणार आहेत. कोणीही अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर पडू नये अन्यथा संबंधीतावर वरील कलमान्वये कडक कारवाई करणेत येईल असा इशारा मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी दिला आहे.
नागरिकांनी आपली काळजी घेणेचे दृष्टीने मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, पाण्याची वाफ दिवसातून तीन वेळ घेणे, अर्सेनिक अल्बम या औषधाचे डोस घेणे, दुधामध्ये हळद टाकून उकळून दिवसातून तीन वेळ घ्यावी. साठ वर्षा वरील व्यक्तीने घराबाहेर पडू नका तसेच कोणाच्याही संपर्कात येवू नये. आजारी व्यक्तीने कोणाचे संपर्कात न येता स्वतंत्र राहू काळजी घेणेत यावी असे आवाहन वडगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष शरद पाटील, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी केले.
दरम्यान, या जनता कर्फ्यूला विरोध असल्याचे पत्रकही काही व्यावसायिकांनी काढले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून सर्व व्यापार्यांची आर्थिक स्थिती बिघडली असल्यामुळे प्रशासनाकडून त्यांच्या मदतीकरीता काही हालचाली होणे अपेक्षित होते उलट वडगाव पूर्णतः बंद करण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. छोटे-छोटे व्यावसाईक मेटाकुटीला आहे आहेत. त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वडगाव शहरातील व्यापार-व्यवसाय पूर्णतः बंद न करता सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधी मध्ये सर्व व्यवहार सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अथवा पूर्ण व्यवहार बंद न करता कालावधी कमी करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर भूषण विभूते, विजय माने, बबलू खाटीक, पुष्पराज भोपळे, केतन सूर्यवंशी यांच्या सह्या आहेत. तर व्यापारी असोसिएशनचे मनोज शहा, उपाध्यक्ष महादेव हावळ यांनी बंदला विरोध असल्याचे निवेदन प्रशासनास सादर केले आहे. व्यापार-व्यवसायाची वेळ कमी करावी मात्र पूर्णतः बंद करू नये असे निवेदन व्यापारी असोसिएशनने प्रशासनास सादर केले आहे. सध्या जिल्हाबंदी उठली आहे यामुळे वडगाव बंदच्या काळात सुट्टीचा गैरफायदा घेवून वडगाव शहरातील नागरिक बाहेरगावी फुरून वडगाव शहरात कोरोना आणू शकतात. बंद हा पर्याय नाही वेळ कमी करून आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तर अत्यावश्यक सेवेत असलेल्या बँका, पतसंस्था, विमा कार्यालये दहा दिवस बंद करणे योग्य नसल्याचे या क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बँका, पतसंस्था, विमा कार्यालये या जनता कर्फ्यूमधून वगळावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे