प्रतिनिधी/पेठ वडगाव
हातकणंगले तालुक्यातील पश्चिम भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे रुग्णांची परवड सुरु आहे. या रुग्णांच्या सोयीसाठी पेठ वडगाव येथे कोविड सेंटर तात्काळ सुरु करण्याबाबत पेठ वडगाव येथील पालिकेच्या सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा झाली असून अल्पावधीतच या ठिकाणी कोविड सेंटर सुरु होईल अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
हातकणंगले तालुक्यातील पश्चिम भागात कोरोना रुग्णांची सख्या वाढत चालली असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या तालुक्यात अतिग्रे व हातकणंगले येथे कोविड केंद्र सध्या उपलब्ध आहे. रुग्णसंख्या प्रचंड वाढत असून या दोन्ही केंद्रावर प्रचंड ताण आला आहे. यामुळे तेथे रुग्णांची गैरसोय होत आहे. पेठ वडगाव परिसरातील ३२ खेड्यातील गावांत सापडणार्या कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी पेठ वडगाव येथे कोविड सेंटर सुरु होणे गरजेचे आहे. या बाबत पेठ वडगाव येथील युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. तर याबाबत युवक क्रांती महाआघाडीच्यावतीने खासदार धैर्यशील माने यांना माहिती देवून यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली होती.
पेठ वडगाव येथे कोविड सेंटर सुरु होण्याबाबत खासदार धैर्यशील माने यांचेशी संपर्क साधला असता पेठ वडगाव येथे कोविड सेंटर होणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांचेशी पत्रव्यवहार व चर्चा झाली असून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. पेठ वडगाव येथे लवकरच कोविड सेंटर कार्यरत होईल अशी ग्वाही खासदार माने यांनी दिली.









