गटार नसल्याने पाणी तुंबून राहून पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव मधील वडगाव पोलीस ठाण्याच्या समोरील गटाराचे बांधकाम गेल्या कित्येक वर्षापासून अपूर्ण आहे. या अपुर्ण कामामुळे कायद्याचे रक्षणकर्तेच अस्वच्छतेच्या विळख्यात आहेत. या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, वडगाव पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अशा पद्धतीने अर्धवट स्वरुपात ठेवण्यात येणाऱ्या गटार, रस्ते कामांची माहिती मतदारसंघाचे खासदार व आमदार यांनी घेणे गरजेच आहे.
पेठ वडगाव शहरात वडगाव हायस्कूल परिसर ते पोलीस ठाणेपर्यंत गटार नसल्याने कायद्याचे रक्षणकर्तेच घाण आणि दुर्गंधीच्या साम्राज्यात आहेत. या ठिकाणी गटारीच्या पाण्यामुळे पोलीस ठाणे परिसरात डासांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विद्यालय परिसरातील गटाराचे काम हे अर्धवटच ठेवण्यात आले आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर हे गटार तुंबते. यावेळी पाण्याचे लोट नागरिकांच्या घरात घुसून त्यांचे नुकसान होते. या परिसरातील नागरिकांनी पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून देखील काहीच उपयोग होत नसल्याने या मतदार संघाचे खासदार व आमदार यांनी या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास ही गटार पूर्ण करण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे. तर इतके दिवस या गटारीचे काम अपूर्णावस्थेत का ? असा सवालही उपस्थित होतोय.









