स्थायी समिती सभेत अध्यक्ष राहूल पाटील यांची सूचना, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी, बांधकाम विभागाकडून कामात दिरंगाई होत असल्याची तक्रार
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यातील 175 गावे महापूरग्रस्त आहेत. त्यामुळे महापूराच्या काळात या गावांतील लसीकरण मोहिम ठप्प होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तेथील 18 वर्षांवरील सर्व नागरीकांना सरसकट लस देण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली आहे. त्याबाबत आरोग्य विभागाकडूनही पाठपुरावा करून या गावांत सर्वांना लस देण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना दिली.
जि.प.तील पदाधिकारी बदलानंतर मंगळवारी पहिली स्थायी समिती सभा पार पडली. राहूल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आरोग्य व बांधकाम सभापती वंदना जाधव, महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, समाजकल्याण सभापती कोमल मिसाळ, शिक्षण व अर्थ सभापती अरुण इंगवले, राजवर्धन नाईक निंबाळकर आदी समिती सदस्य उपस्थित होते.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क रहावे. ही लाट येण्यापूर्वीच थोपवता येईल काय ? यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्या लागतील याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांशी पदाधिकाऱयांनी सविस्तर चर्चा केली. तसेच तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडे पुरेशी यंत्रणा उपलब्ध आहे काय ? याची पदाधिकाऱयांनी माहिती घेतली. जिह्यात कार्यरत कोविड केंद्रांना पूरक औषधे व आरोग्य यंत्रणा पुरवून त्यांना अधिक सक्षम करा अशा सूचनाही अध्यक्ष पाटील यांनी दिल्या.
बांधकाम विभागाची कामे प्रलंबित
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कांडगावे हे सध्या रजेवर आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांचा कार्यभार कुलकर्णी यांच्याकडे आहे. पण कुलकर्णी यांच्याकडून कामाच निपाटारा होत नसून अनेक कामे प्रलंबित असल्याची तक्रार अरुण इंगवले व राजवर्धन निंबाळकर यांनी सभेमध्ये मांडली. या तक्रारीची दखल घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावली जातील अशी ग्वाही कुलकर्णी यांनी दिली.
विजेचा धक्क्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांच्या मदतीसाठी प्रयत्न करुया
कागल तालुक्यातील बाचणी गावामध्ये मंगळवारी सकाळी विजेचा धक्क्याने आई व मुलग्याचा मृत्यू झाला. या कुटूंबियांना जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद पातळीवर आणि वैयक्तीक पातळीवर मदत करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया असे आवाहन अध्यक्ष राहूल पाटील यांनी केले.
आरोग्यमंत्री टोपे, राज्यमंत्री यड्रावकरांच्या अभिनंदनाचा ठराव
आरोग्य मंत्री राजेश टोपे व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची जि.प. च्या नूतन पदाधिकाऱयांनी भेट घेऊन मोठÎा प्रमाणात लसींचा पुरवठा करावा अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन कोल्हापूरसाठी तत्काळ 48 हजार लसींचा पुरवठा केल्याबद्दल स्थायी समिती सभेत दोन्ही मंत्र्यांच्या अभिनंदनांचा ठराव करण्यात आला.









